सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधूने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये स्थान मिळवले आहे. परंतु माजी विजेत्या पी. कश्यपसहित पुरुष विभागातील अव्वल चार मानांकित खेळाडूंचे स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
एक लाख २० हजार अमेरिकन डॉलर्स पारितोषिक रकमेच्या या स्पध्रेत १६व्या मानांकित शुभंकर डेने द्वितीय मानांकित अजय जयरामचा २१-१९, २१-१७ असा पराभव केला, तर मलेशियाच्या १२व्या मानांकित झुल्फदली झुल्किफ्लीचा २१-१६, २१-१२ असा पराभव केला. पहिल्या दोन मानांकित खेळाडूंप्रमाणे तृतीय मानांकित आरएमव्ही गुरू साई दत्त आणि चौथ्या मानांकित आनंद पवारला पराभवाचा धक्का बसला आहे.
पवारने पहिल्या गेममध्ये तीन गेम पॉइंट्स वाचवले. परंतु मलेशियाच्या इस्कंदर झुल्करनैन झैनुद्दीनविरुद्धच्या लढतीत तो पराभव टाळू शकला नाही. झैनुद्दीनने २२-२०, २१-११ असा विजय मिळवला. त्यानंतर ११व्या मानांकित बी. साई प्रणिथने गुरू साई दत्तला १५-२१, २१-९, २१-१६ असे पराभूत केले. त्याची उपांत्यपूर्व फेरीत थायलंड ग्रा. प्रि. गोल्ड विजेत्या आणि सहाव्या मानांकित के. श्रीकांतशी गाठ पडणार आहे. श्रीकांतने १४व्या मानांकित अरविंद भटचा १९-२१, २३-२१, २४-२२ असा पराभव केला.
महिला विभागात अव्वल मानांकित सायनाने आपली घोडदौड कायम राखताना रशियाच्या नतालिया पर्मिनोव्हाला फक्त २८ मिनिटांत २१-५, २१-१० असे पराभूत केले. तसेच द्वितीय मानांकित पी. व्ही. सिंधूने स्वित्र्झलडच्या सब्रिना जॅकेटचा २१-१९, २१-५ असा पराभव केला, तर अरुंधती पनतावणेने थायलंडच्या नताचा साइंगचोटेला २१-१३, २१-११ असे पराभूत केले.
सायनाची क्रमवारीत आणखी घसरण
नवी दिल्ली : सायना नेहवालची जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत नवव्या स्थानी घसरण झाली आहे, तर पी.व्ही.सिंधूने ११वे स्थान कायम राखले आहे. पुरुष गटात पारुपल्ली कश्यपने १८व्या स्थानी झेप घेतली आहे तर अजय जयरामने २१वे स्थान पटकावले आहे. पुरुष, महिला आणि मिश्र दुहेरीच्या क्रमवारीत अव्वल २५ मध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा