Syed Mohsin Raza Naqvi PCB 37th Chairman : पाकिस्तान क्रिकेट बोर्डात बदलाची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. रमीझ राजा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पाकिस्तान बोर्डात खळबळ उडाली होती. मात्र, सय्यद मोहसिन रझा नक्वी यांची एकमताने आणि बिनविरोध पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सय्यद मोहसिन रझा नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ३७ वे अध्यक्ष असतील. लाहोर येथील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये प्रशासकीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत सय्यद मोहसीन रझा नक्वी यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली.
सय्यद मोहसीन रझा नक्वी यांच्या नावाला प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली –
पीसीबीचे अध्यक्ष शाह खवर यांनी बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या बैठकीची अध्यक्षता केली. शाह खवर हे पीसीबी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयुक्त आणि हंगामी पीसीबी अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. अशाप्रकारे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला गेल्या वर्षभरात चौथ्यांदा नवे अध्यक्ष मिळाले आहेत. त्याचवेळी रमीझ राजा यांच्यानंतर आता पीसीबीला स्थानिक अध्यक्ष मिळाला आहे. सय्यद मोहसिन रझा नक्वी हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत.
रमीझ राजा यांच्यानंतर बदलाची प्रक्रिया सुरू झाली –
उल्लेखनीय म्हणजे डिसेंबर २०२२ मध्ये रमीझ राजा यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. रमीझ यांच्या राजीनाम्यानंतर नजम सेठी यांना अध्यक्षपदाची खुर्ची मिळाली. पण बदलाची प्रक्रिया इथेच थांबली नाही. गेल्या वर्षी जुलैमध्ये नजम सेठींच्या जागी झका अश्रफ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष बनले. मात्र आता सय्यद मोहसिन रझा नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ३७ वे अध्यक्ष असतील.