Ajinkya Rahane in SMAT: सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेच्या ५६ चेंडूत ९८ धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर मुंबईने सेमी फायनलमध्ये बडोद्याला ६ विकेट्सनी नमवलं आणि फायनल गाठली. रहाणेचं शतक व्हावं यासाठी सूर्यकुमार यादवने ६ चेंडूवर धाव घेतली नाही. शतकाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या रहाणेला अभिमन्यूसिंग राजपूतने बाद केलं. रहाणेने ११ चौकार आणि ५ षटकारांसह मुंबईच्या विजयाचा पाया रचला. या सीझनमध्ये तिसऱ्यांदा अजिंक्य रहाणे शतक करण्यापासून हुकला आहे. या स्पर्धेतील त्याचे हे तिसरे आणि टी२० कारकिर्दीतील ४८ वे अर्धशतक होते. रहाणेच्या तडाखेबंद खेळीमुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी म्हणून निवडले गेले. या स्पर्धेतील ही त्याची तिसरी ट्रॉफी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बंगळुरूतल्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या लढतीत मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत बडोदा संघाला १५८ धावांमध्येच रोखलं. बडोद्याची भिस्त हार्दिक आणि कृणाल पंड्या या बंधूंवर होती. मात्र दोघांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आलं. कृणालने ३० तर हार्दिकने ५ धावांची खेळी केली. शिवालिक शर्माने (३६) तर शाश्वत रावत (३३) धावा केल्या. स्पर्धेत आतापर्यंत दमदार खेळ करणाऱ्या बडोद्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मुंबईतर्फे सूर्यांश शेडगेने २ तर मोहित अवस्थी, शार्दूल ठाकूर, शिवम दुबे, तनुश कोटियन आणि अथर्व अंकोलेकर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने पृथ्वी शॉ याला झटपट गमावलं. तो ८ धावा करुन तंबूत परतला. पण यानंतर अजिंक्य रहाणेला कर्णधार श्रेयस अय्यरची तोलामोलाची साथ मिळाली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५६ चेंडूत ८८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. श्रेयस ३० चेंडूत ४६ धावा करून बाद झाला. त्याने ४ चौकार आणि ३ षटकारांसह ही खेळी सजवली. श्रेयस बाद झाल्यानंतर रहाणेने मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

हे वाचा >> Vinod Kambli Wife: ‘पोस्टरवर पाहिलं आणि ठरवलं हिच्याशीच लग्न करणार’, पत्नी अँड्रियाशी दुसरे लग्न; विनोद कांबळींनी सांगितली लव्ह स्टोरी

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत रहाणेची बहारदार कामगिरी

आतापर्यंत ८ सामन्यात अजिंक्यने ६१.७१ च्या सरासरीने ४३२ धावा ठोकल्या आहेत. तर १६९.४१ असा जबरदस्त स्ट्राईक रेट आहे. ४०० गहून अधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे.

आयपीएल २०२५ साठी अंजिक्यला कोलकाता नाईट राइडर्सने आपल्या ताफ्यात सामावून घेतलं आहे. त्यामुळं त्याच्या या फलंदाजीवर केकेआर संघही भलताच खूश दिसतोय. केकेआरने आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकत अंजिक्यच्या खेळीचं कौतुक केलं आहे.

आठ सामन्यातले प्रदर्शन कसे राहिले?

गोवा – १३ (१३)

महाराष्ट्र – ५२ (३४)

केरळ – ६८ (३५)

सर्विस २२ (१८)

आंध्रा ९५ (५४)

विदर्भ ८४ (४५)

बडोदा ९८ (५६)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Syed mushtaq ali trophy ajinkya rahane scores 98 runs in 56 balls takes mumbai into final kkr stunning comment kvg