विदर्भाचे आव्हान संपुष्टात; गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका

विदर्भाच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा घेत मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या बाद फेरीत सलग दुसरा विजय मिळवला. सुदैवी ठरलेल्या श्रेयस अय्यरच्या नाबाद ८६ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने विदर्भावर पाच विकेट्सने मात केली. सलग दोन विजयांमुळे मुंबईने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे, तर विदर्भाचे आव्हान दोन पराभवांमुळे संपुष्टात आले आहे.

मुंबईने नाणेफेक जिंकत विदर्भाला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि त्यांना दुसऱ्याच चेंडूवर धवल कुलकर्णीने धक्का दिला. पण त्यानंतर जितेश शर्मा आणि गणेश सतीश (२५) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी रचत संघाला सावरले. पण गणेश बाद झाल्यावर जितेशही ठरावीक फरकाने संघाचे शतक लागण्यापूर्वी तंबूत परतला. जितेशने ३० चेंडूंत ६ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५६ धावांची खेळी साकारली. त्यानंतर रवी जांगिडही (१५) झटपट बाद झाल्याने विदर्भाचा संघ अडचणीत सापडला असताना अपूर्व वानखेडे (नाबाद ३६) आणि उर्वेश पटेल (नाबाद ३१) यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत संघाला १८१ धावांचा पल्ला गाठून दिला.

विदर्भाच्या १८२ धावांचा पाठलाग करताना मुंबईलाही दुसऱ्याच चेंडूवर धक्का बसला. पण त्यानंतर फॉर्मात असलेला कर्णधार आदित्य तरे (४१) आणि तडफदार फलंदाज श्रेयस अय्यर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी रचत संघाला स्थैर्य मिळवून दिले. श्रेयसच्या डावाची सुरुवातच अडखळत झाली. त्याला १३ धावांवर असताना पहिले जीवदान मिळाले. या जीवदानाचा फायदा घेत त्याने मोठे फटके मारत अर्धशतकही झळकावले, पण त्यानंतरही तो खेळपट्टीवर स्थिरस्थावर नसल्याचेच दिसून आले. त्यानंतर त्याला ५२ आणि ६१ या वैयक्तिक धावसंख्येवर जीवदान मिळाले. यादरम्यान २८ धावा करणाऱ्या सिद्धेश लाडला १४ धावांवर असताना जीवदान मिळाले. विदर्भाला हे झेल सोडणेच महागात पडले. श्रेयसने याचा पुरेपूर फायदा घेत ५१ चेंडूंत ४ चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर ८६ धावांची खेळी साकारली. पण संघाला अखेरच्या षटकांमध्ये गरज असताना तो बाद झाला.

संक्षिप्त धावफलक

विदर्भ : २० षटकांत ४ बाद १८१ (जितेश शर्मा ५६, अपूर्व वानखेडे नाबाद ३६; सागर त्रिवेदी २/४४, धवल कुलकर्णी १/२७) पराभूत वि. मुंबई : १८.५ षटकांत ५ बाद १८२ (श्रेयस अय्यर नाबाद ८६, आदित्य तरे ४१; रवी कुमार ठाकूर २/३२).

उत्तर प्रदेशचा विजय

समर्थ सिंगच्या नाबाद ६५ धावांच्या जोरावर उत्तर प्रदेशने गुजरातवर सात विकेट्स राखून सहज विजय मिळवला. गुजरातने मनप्रीत जुनैजाच्या (५६) अर्धशतकाच्या जोरावर १६५ धावांपर्यंत मजल मारली.

झारखंड पराभूत

परविंदर अवानाची भेदक गोलंदाजी आणि नितीश राणाच्या नाबाद ६० धावांच्या जोरावर दिल्लीने झारखंडवर पाच विकेट्स राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना झारखंडला १३४ धावाच करता आल्या. अवानाने तीन बळी मिळवले.

केरळचा विजय

केरळने बडोद्यावर चार विकेट्स राखून विजय मिळवला. बडोद्याचे  १६० धावांचे लक्ष्य केरळने सचिन बेबी (४४) व  रैफी गोमेझ ( ४७) यांच्या जोरावर सहज पार केले.

Story img Loader