टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताचा सामना आज अफगाणिस्तानविरोधात होणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत स्पर्धेमध्ये दोन महत्वाचे सामने गमावल्याने पुढील फेरीतील भारताचा प्रवेश आता अनिश्चित मानला जात असताना आज लाज राखण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विजय मिळवणं विराट कोहलीच्या संघाला अनिवार्य आहे. मात्र असं असतानाच पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे भारतीय संघावर जोरदार टीका होताना दिसतेय. त्यातच आता अभिनेता कमाल राशिद खान म्हणजेच केआरकेनेही विराट कोहली आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींवर निशाणा साधलाय. न्यूझीलंडविरोधातील सामन्यात झालेल्या पराभवानंतर केआरकेने रवी शास्त्रींची खिल्ली उडवली आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक २४ तास नशेच्या धुंदीत असतात असा टोला केआरकेने लगावला आहे.

केआरकेने यूट्यूबवर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. भारत आणि न्यूझीलंड सामन्याचं विश्लेषण करताना केआरकेने, “रवी शास्त्री २४ तास नशेच्या धुंदीत असतात. एखाद्या लहान मुलाने त्यांचा चेहरा पाहिला तर तो चार दिवस रडत राहील. जेव्हा विराट कोहलीने न्यूझीलंडविरोधातील सामन्यात पहिलं षटक कोणाला द्यावं असं विचारलं असेल तेव्हा नशेच्या धुंदीतच त्यांनी विराटला वरुन चक्रवर्तीला पहिलं षटक टाकायला सांग असं सांगितलं असेल,” असा टोला केआरकेने लगावला आहे.

“नाणेफेक हारल्यानंतर कोहली थरथरु लागला. त्याच्या भीतीचा काही ठिकाणा नव्हता. कोहलीने तेव्हाच मान्य केलं की आपण हा सामना १०० टक्के हरणार आहे. रोहित शर्माच्या आधी ईशान किशनला सलामीला पाठवण्याचा निर्णयही चुकला. तो मुलगा कधी कधी आयपीएलमध्ये धावा करतो पण आंतरराष्ट्रीय सामने खेळणे आणि आयपीएल खेळणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत,” असा टोला केआरकेने लगावला आहे.

“ईशान किशनला संघामध्ये घेणं मोठी चूक होती. त्याहून मोठी चूक ही होती की त्याला सलामीला पाठवलं. विराटने तर आधीच पराभव मान्य केलेला. तो प्रत्येक चेंडूवर कसा वाचला हे त्याला माहिती किंवा देवाला ठाऊक,” असंही केआरके म्हणाला आहे.

आजचा सामना रंगतदार होणार…
अबू धाबी येथे अव्वल-१२ फेरीतील लढतीत उभय संघ आमनेसामने येणार असून या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवण्यासाठी भारतीय खेळाडूंना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. भारताच्या संघनिवडीकडेही सर्वांचे लक्ष राहणार असून अफगाणिस्तानने यापूर्वी आपल्याला अनेकदा कडवी झुंज दिली असल्याने चाहत्यांना रंगतदार सामना पाहायला मिळेल.

अफगाणिस्तानची दमदार कामगिरी…
दुसऱ्या गटात समावेश असलेल्या भारताला सलामीला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने सहज धूळ चारली. त्यामुळे भारत सध्या गुणतालिकेत शून्य गुणासह पाचव्या स्थानी आहे. मोहम्मद नबीच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानने मात्र स्कॉटलंड, नामिबिया यांना धूळ चारून तूर्तास गटात दुसरे स्थान पटकावले आहे. अफगाणिस्तानला फक्त पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला.

Story img Loader