India ODI Squad Announcement Updates: टी २० विश्वचषकाच्या आधी भारतीय संघातील गोलंदाजांची फळी कमकुवत होताना दिसत होती. एकीकडे अष्टपैलू रवींद्र जडेजाची अनुपस्थिती तर दुसरीकडे जसप्रीत बुमराहच्या पाठीची दुखापत यामुळे टीम इंडिया अनुभवी गोलंदाजांची कमी कशी भरून काढणार हा प्रश्नच होता. मात्र आता दोन महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बुमराह अजूनही विश्वचषकातून बाहेर झाला नसल्याचे वक्तव्य केले आहे. तर आक्रमक गोलंदाज मोहम्मद शमी सुद्धा करोनातुन बरा झाला आहे.

टी २० विश्वचषकाच्या आधी मोहम्मद शमी पुन्हा एकदा सरावला लागला आहे. शनिवारी यासंदर्भात एक व्हिडीओ पोस्ट करून शमीने स्वतः याबद्दल माहिती दिली. “सफर जारी है” असे कॅप्शन देत शमीने आपला सरावाचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडिओनंतर आता टी २० विश्वचषकात शमीची एंट्री होऊ शकते असा अंदाज आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी शमीला कोविड-19 ची लागण झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतर याबाबत काहीच अपडेट देण्यात आला नव्हता. अनेकदा तर चाहत्यांनी सुद्धा शमीला मॅसेज करून त्याच्या पुनरागमनाबाबत विचारणा केली होती. एकीकडे मागील काही काळात भारतीय गोलंदाजांचा डळमळीत खेळ पाहता चाहत्यांना शमीकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

मोहम्मद शमी टी २० विश्वचषकात परतणार?

दरम्यान, शमीने शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध खेळला होता. इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल एकदिवसीय सामन्यात त्याने दोन विकेट घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका अशा दोन्ही टी २० मालिकांमध्ये शमीला विश्रांती देण्यात आली होती तर त्याच्या जागी उमेश यादव संघात स्थान मिळाले होते.

Story img Loader