T Natarajan’s cricket stadium in Chinnappampatti village in Tamil Nadu: भारताचा स्टार वेगवान गोलंदाज टी नटराजनने त्याच्या गावात स्वतःचे क्रिकेट स्टेडियम बांधले आहे. आपल्या गावात लहान मुले आणि युवा खेळाडूंसाठी मैदान बनवण्याचे नटराजन आणि त्यांच्या प्रशिक्षकाचे स्वप्न होते. आता नटराजन यांनी स्वतःचे आणि प्रशिक्षकाचे हे स्वप्न साकार केले आहे. गेल्या २३ जून, शुक्रवारी नटराजन यांच्या या मैदानाचे उद्घाटन झाले.
भारताचा स्टार फलंदाज दिनेश कार्तिक मैदानाच्या उद्घाटनासाठी पोहोचला होता. कार्तिकने रिबन कापून स्टेडियमचे उद्घाटन केले. नटराजन यांनी हे स्टेडियम सालेम जिल्ह्यातील त्यांच्या चिन्नमपट्टी गावात सुरू केले. मैदानाच्या उद्घाटन सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दिनेश कार्तिक आणि टी नटराजन यांच्यासोबत गुजरात टायटन्सचा खेळाडू साई किशोर देखील फोटोमध्ये दिसला. तो नटराजनच्या शेजारी उभा असलेला दिसत आहे.
या सुविधा मैदानात उपलब्ध –
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मैदानावर एकूण चार खेळपट्ट्या बनवण्यात आल्या आहेत. याशिवाय येथे जिम आणि कॅन्टीनची सुविधाही उपलब्ध आहे. त्याचबरोबर मैदानात १०० आसनक्षमतेचा स्टँडही तयार करण्यात आला आहे, जिथे लोक बसून सामन्याचा आनंद घेऊ शकतील. टी नटराजन स्वतः येथील युवा खेळाडू आणि मुलांना प्रशिक्षण देणार आहे.
हेही वाचा – Virat Kohli: “लोअर लेले भाई…”, अंडर-१७ पासून विराटसोबत असणाऱ्या खेळाडूशी असा झाला होता पहिला संवाद
उद्घाटन समारंभास उपस्थित लोक –
मैदानाच्या उद्घाटन समारंभाला तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पी. अशोक सिगामणी आणि अभिनेता योगी बाबू यांच्यासह अनेक लोक उपस्थित होते. याशिवाय वॉशिंग्टन सुंदर आणि वरुण चक्रवर्ती हे भारतीय खेळाडूही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
नटराजन भारताकडून तिन्ही फॉरमॅट खेळला आहे –
डिसेंबर २०२० मध्ये पदार्पण करणाऱ्या टी नटराजनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत एक कसोटी, दोन एकदिवसीय आणि चार टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात ३-३ विकेट्स आणि आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ७ विकेट घेतल्या आहेत. मार्च २०२१ मध्ये त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तो दोन वर्षांहून अधिक काळ संघाबाहेर आहे. टी नटराजन हा आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळतो.