टी२० क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ आहे, असे मानले जाते. टी२० म्हंटले कि चौकार आणि शेतकरी बरसात होणार असे गृहीत धरले जाते. इतकेच नव्हे तर कोणत्याही टी२० सामन्यात विजयासाठी प्रथम फलंदाजीवर मदार असल्याचे म्हटले जाते. पण इंग्लंडमधील एका खेळाडूने फलंदाजी इतकाच गोलंदाजीवरही टी२० सामना अवलंबून असतो, हे दाखवून दिले आहे.
इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेट स्पर्धेत टी२० सामन्यात केंट विरुद्ध सरे हा सामना रंगला होता. हा सामन्यात जो डेण्टली या खेळाडूने टी२० क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एक अभूतपूर्व असा विक्रम केला. डेण्टलीने एकाच सामन्यात शतक ठोकले आणि त्याबरोबरच शानदार गोलंदाजी करत हॅट्रिक देखील मिळवली. अशी कामगिरी करणारा जो हा टी२० मधील पहिला खेळाडू ठरला आहे.
या सामन्यात केंट संघाने प्रथम गोलंदाजी केली. त्यांच्या गोलंदाजांनी सरेच्या फलंदाजांना १८.५ षटकांत १६७ धावांत रोखले. या डावात डेण्टलीने ४ षटकांत ३१ धावा दिल्या आणि तीन बळी टिपले. सामन्याच्या १३ व्या षटकात चौथ्या चेंडूवर त्याने रिकी क्लार्क याला ११ धावांवर झेलबाद केले. त्यानंतरच्या चेंडूवर त्याने जेमी स्मिथला पायचीत केले आणि पाठोपाठ षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मॅथ्यू पीलन्स याला झेलबाद केले. या सामन्यात सरेने दिलेल्या १६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर डेण्टलीने महत्वाची भूमिका बजावली. त्याने १२ चौकार आणि २ षटकारांसह ६३ चेंडूत १०२ धावा ठोकल्या. ही कामगिरी करणारा तो टी२०तील पहिलाच खेळाडू ठरला आहे.