२००२ साली इंग्लंडमध्ये बेन्सन आणि हेजेस चषक खेळवण्यात आला, पण त्यानंतर इंग्लंडच्या मंडळाकडे थोडा रिकामा अवधी होता, या अवधीमध्ये पुन्हा एकदिवसीय सामने खेळवले तर प्रेक्षक येणार नाहीत, याची भीती होती. त्यावेळी मंडळाचे विपणन व्यवस्थापक स्टुअर्ट रॉबर्टसन यांनी या नवीन प्रकाराचा शोध लावला. त्यांनी बैठकीत हा प्रस्ताव ठेवला आणि ११-७ अशा फरकाने या प्रकाराला संमती मिळाली. त्यानंतर इंग्लंडमध्ये स्थानिक स्तरावरील ट्वेन्टी-२० सामन्यांना १३ जून २००३ साली सुरुवात झाली. त्यानंतर २००४मध्ये पाकिस्तानमध्ये ट्वेन्टी-२० लीग खेळवण्यात आली आणि त्यामध्ये फैसलाबाद वोल्व्हस विजयी ठरले. १२ जानेवारी २००५ला ऑस्ट्रेलियामध्ये ट्वेन्टी-२० लीग सुरू झाली, त्यानंतर ११ जुलै २००६ साली स्टॅनफोर्ड ट्वेन्टी-२० लीगही खेळवण्यात आली. या दरम्यानच्या काळात पहिला आंतरराष्ट्रीय सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये १३ जून २००५ ला खेळवण्यात आला, ज्यामध्ये इंग्लंडने १०० धावांनी विजय मिळवला. एकिकडे जगभरात ट्वेन्टी-२० क्रिकेटची धूम सुरू झाली असताना भारत मात्र शांत होता. भारत पहिला ट्वेन्टी-२० सामना १ डिसेंबर २००६ या दिवशी जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला आणि सहा विकेट्स व एक चेंडू राखत जिंकला. सचिन तेंडुलकरचा हा एकमेव आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामना होता, ज्यामध्ये त्याने फक्त १० धावा केल्या होत्या.
भारताने सुरुवातीला ट्वेन्टी-२० क्रिकेटकडे पाहून नाके मुरडली होती खरी, पण पहिला विश्वचषक त्यांनीच पटकावला आणि देशामध्ये क्रांती वैगेरे घडल्यासारखे वातावरण होते. आणि खरोखरच भारतामध्ये आयपीएलच्या माध्यमातून एक ‘अर्थ’पूर्ण क्रांती घडली, जिने क्रिकेटविश्वाला दाखवून दिले की, क्रिकेटमध्ये पैसा कसा कमवायचा हे भारतीयच दाखवून देऊ शकतात. आता क्रिकेटविश्वामध्येच १६ ट्वेन्टी-२० लीग आहेत, पण आयपीएल एवढा पैसा, ग्लॅमर आणि प्रसिद्धी अन्य कोणत्याही लीगला मिळालेली नाही. आयपीएलमध्ये काहीही घडो, स्पॉट-फिक्सिंग असो किंवा आयपीएलचा जन्मदाता ललित मोदीची हकालपट्टी, पण ही लीग काही बंद होण्यातली नक्कीच नाही. भारतामध्येही स्थानिक पातळीवर मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा होते, पण आयपीएल एवढे ग्लॅमर बीसीसीआयच्या या स्पर्धेला मात्र नाही.
आतापर्यंत झालेल्या चार ट्वेन्टी-२० विश्वचषकात पहिली स्पर्धा सोडली, तर अन्य विश्वचषकात भारतावर नामुष्की ओढवली होती. पहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या थरारक सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच धावांनी विजय मिळवत जेतेपदाला गवसणी घातली होती. पण त्यानंतर मात्र भारतावर अनुक्रमे सातवे, आठवे आणि पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. २००९ साली पाकिस्तानने, २०१० साली इंग्लंडने आणि २०१२ साली वेस्ट इंडिजने जेतेपदावर मोहोर उमटवली होती.
भारतामध्ये दरवर्षी आयपीएलच्या सामन्यांना चांगलीच गर्दी होत असली, तरी भारतीय संघ मात्र जास्त आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२०चे सामने खेळताना दिसत नाही. भारताने आतापर्यंत ४६ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये २५ सामन्यांमध्ये विजय आणि १९ सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. सर्वाधिक ७८ सामने पाकिस्तानच्या नावावर असून भारताचा या यादीमध्ये आठवा क्रमांक लागतो. खेळाडूंना आयपीएलसाठी तंदुरुस्त ठेवण्यासाठी कमीत कमी आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामने खेळवण्याचा विचार कदाचित भारतीय क्रिकेट मंडळ करत असावे.
आतापर्यंत ट्वेन्टी-२०ने चांगलीच लोकप्रियता मिळवलेली आहे. या धावत्या जगात कसोटी आणि एकदिवसीय सामने पाहण्याकडे चाहत्यांचा कल कमी असून तीन तासांचा सिनेमा पाहावा तसे त्यांना ट्वेन्टी-२० क्रिकेट अधिकाधिक आवडू लागले आहे. पण आतापर्यंत ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका मात्र खेळवण्यात आलेली नाही, पण चाहत्यांचा प्रतिसाद पाहता तो दिवस काही नक्कीच दूर नाही. ट्वेन्टी-२०चा हा वृक्ष झटपट मोठा होताना दिसतोय, त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये क्रिकेटविश्वावर ट्वेन्टी-२०चे अधिराज्य प्रस्थापित झाले तर त्याचे नवल वाटू नये.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा