टी २० वर्ल्डकपमधील भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आयपीएलमधील खेळाडूंची कामगिरी पाहता वर्ल्डकप विजयासाठी टीम इंडियाला पसंती मिळाली होती. मात्र पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभवाचं तोंड पाहावं लागल्याने उपांत्य फेरीच्या आशा मावळल्या. तर धावगतीच्या जोरावर उपांत्य फेरीचा मार्गही बंद झाला आहे. नामिबिया विरुद्धचा सामना केवळ औपचारिकता आहे. त्यामुळे आता आजी माजी क्रिकेटपटूंनी वर्ल्डकप स्पर्धेबाहेर जाण्याची आणि पराभवाची कारणं सांगितली आहे. माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनीही भारताच्या निराशाजनक कामगिरीबाबत विश्लेषण केलं आहे.
पॉवरप्लेमध्ये भारतीय फलंदाजी हवी तशी झाली नसल्याचं मत सुनील गावसकर यांनी व्यक्त केलं आहे. या स्पर्धेतच नाही, तर अनेक स्पर्धांमध्ये असंच होत आलं आहे. त्यामुळे संघाचं खूप नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं. “पॉवरप्लेमध्ये दोन खेळाडूच ३० यार्डच्या बाहेर उभे असतात. भारताने मागच्या काही आयसीसी स्पर्धांमद्ये पॉवरप्लेचा योग्य वापर केलेला नाही. त्यामुळे चांगली गोलंदाजी असलेल्या संघासमोर धावसंख्या उभारता येत नाही. यात बदल होणं गरजेचं आहे.”, असं मत सुनील गावसकर यांनी स्पोर्ट तकशी बोलताना व्यक्त केलं.
दुसरीकडे, पराभवानंतर प्लेईंग इलेव्हनमध्ये जास्त बदल करू नये, असं गावसकर यांनी सांगितलं. भारताने आपल्या संघात बदल केले आणि त्यामुळे संघाच नुकसान झालं. “भारतीय संघात खूप सारे बदल करणं चुकीचं आहे. दोन सामन्यात फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळेत भारतीय संघ इथे पोहोचला आहे. या विचारांमध्ये बदल झाला पाहीजे.” असंही सुनील गावसकर यांनी सांगितलं. भारतीय संघ पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाविरूद्ध मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने ७ गडी गमवून १५२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पाकिस्तानने १० गडी आणि १३ चेंडू राखून पूर्ण केलं. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताने २० षटकात ७ गडी गमवून १११ धावांचं आव्हान टेवलं. हे आव्हान न्यूझीलंडने ८ गडी आणि ३३ चेंडू राखून पूर्ण केलं.