टी २० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याचा आशा अद्यापही कायम आहेत. पाकिस्तानने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला असला तरी उपांत्यफेरीत जाणारा दुसरा संघ कोण ही चुरस कायम आहे. दुसऱ्या स्थानासाठी भारताबरोबरच अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडचा संघ दावेदार आहे. त्यामुळेच प्रत्येक सामन्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करुन उरलेल्या त्या एका स्थानी आपल्या संघाचं नाव असावं म्हणून तिन्ही संघ जीव ओतून खेळताना दिसत आहेत. मात्र शुक्रवारी झालेल्या दोन्ही सामन्यांचा प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष फायदा भारतालाच झालाय. भारताने अवघ्या ३९ चेंडूंमध्ये लक्ष्य काढून स्कॉटलंडला पराभूत करण्याबरोबरच आपल्या नेट रन रेटमध्ये चांगली सुधारणा केलीय.
न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान सामन्यावर आता भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे या सामन्यावर भारतीय क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत. सोशल मीडियावर भारतीय चाहते अफगाणिस्तानच्या बाजून उभे ठाकले आहेत. तसेच एकापेक्षा एक सरस असे मीम्स शेअर करत आहेत.
न्यूझीलंड जिंकल्यास काय होईल?
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंड जिंकल्यास ‘मेन इन ब्लॅक’ अगदी सहजपणे उपांत्य फेरी गाठेल. त्यावेळी भारताचं नेट रन रेटही (NRR) महत्त्वाचं राहणार नाही. अशा परिस्थितीत भारत थेट विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर जाईल. या विजयासह किवीचे ८ पॉईंट होतील. हा टप्पा गाठणं भारताच्या आवाक्याबाहेर राहिल. त्यामुळे न्यूझीलंडचा विजय हा भारतासाठीच सर्वात वाईट शक्यता आहे.
अफगाणिस्तान जिंकल्यास काय होईल?
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानने विजय मिळवला तर भारतासाठी आशेचा किरण कायम राहिल. मात्र, यास्थितीत उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी अफगाणिस्तानचीही दावेदारी राहील. भारताला आपली दावेदारी कायम ठेवण्यासाठी पुढील नामिबिया विरोधातील सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल तरच नेट रन रेटच्या आधारावर भारत उपांत्या फेरी गाठू शकेल. मात्र, अफगाणिस्तानचं नेट रन रेट देखील निर्णयाक ठरेल.