टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत ऑस्ट्रेलियाने बांगलादेशवर ८ गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बांगलादेशला ७३ धावांवर रोखलं. बांगलादेशचा १५ षटकात सर्वबाद ७३ धावा करू शकला आणि विजयासाठी ७४ धावांचं आव्हान दिलं. बांगलादेशनं दिलेलं आव्हान ऑस्ट्रेलियाने २ गडी गमवून सातव्या षटकात पूर्ण केलं. धावगती वाढल्याने गट १ मध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत दुसरं स्थान पटकावलं आहे. उपांत्य फेरीसाठी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात चुरस आहे.
ऑस्ट्रेलियाचा डाव
बांगलादेशनं दिलेल्या ७४ धावांचा पाठलाग करताना डेविड वॉर्नर आणि एरॉन फिंच जोडीने पहिल्या गड्यासाठी ५८ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे विजय सोपा झाला होता. मात्र शोरिफुल इस्लामच्या गोलंदाजीवर डेविड वॉर्नर १८ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर एरॉन फिंच ४० धावा करून तस्कीन अहमदच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर मिशेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल जोडीने विजयी धावा केल्या.
बांगलादेशचा डाव
बांगलादेशच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजासमोर अक्षरश: नांगी टाकली आहे. पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर लिटन दासचा मिशेल स्टार्कने त्रिफळा उडवला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर सौम्या सरकार ५ धावा करून त्रिफळाचीत झाला. मुशफिकुर रहमानही जास्त काळ मैदानात तग धरू शकला नाही. अवघी एक धाव करून ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. मोहम्मद नईमही १६ चेंडूत १७ धावा करून हेझलवूडच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. तर अफिफ होसैन आपलं खातंही खोलू शकला नाही. त्यानंतर महमुदुल्लाह (१६), अफिफ होसैन (०), शमीम होसैन (१९), महेदी हसन (०), मुस्ताफिजुर रहमान (४) आणि शोरिफुल इस्लाम (०) या धावसंख्येवर बाद झाले.
दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया- डेविड वॉर्नर, एरॉन फिंच, मिशेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वॅड, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, एडम झाम्पा, जोश हेझलवूड
बांगलादेश- मोहम्मद नईम, लिटन दास, सौम्या सरकार, मुशफिकर रहिम, महमुदुल्लाह, अफिफ होसैन, शमीम होसैन, महेदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिझुर रहमान, शोरिफुल इस्लाम