टी २० वर्ल्डकपमधील सुपर १२ फेरीतील नामिबिया विरुद्धच्या सामन्यानंतर विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. या स्पर्धेपूर्वीच विराट कोहलीने कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं. कर्णधारपद सोडल्यानंतर शैलीत फरक पडेल का?, असा प्रश्न हर्षा भोगले यांनी सामन्यानंतर विचारला. त्यावर विराट कोहलीने उत्तर दिलं.
” खेळण्याबाबतची तीव्रता कधीही बदलणार नाही. ती बदलली तर, मी यापुढे खेळू शकणार नाही. मी कर्णधार नसतानाही खेळ कुठे चालला आहे हे पाहण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असायचो. मी मैदानात असाच उभा राहणार नाही.”, असं विराट कोहलीने सांगितलं. नंबर ३ वर फलंदाजीसाठी का करत नाही?, असं हर्षा भोगले यांनी पुढे विचारलं असता त्यावरही विराट कोहलीने आपलं मत मांडलं. “सुर्याला जास्त वेळ मिळाला नाही. ही टी २० वर्ल्डकप स्पर्धा आहे आणि मला वाटते त्याच्यासाठी एक आठवण राहील. एक तरूण म्हणून वर्ल्डकपच्या आठवणी कायम स्मरणात असतात.”, असं विराट कोहलीने सांगितलं.
कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर विराट कोहलीने भावनांना वाट करून दिली. “कर्णधारपद माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण माझ्यावरील वर्कलोडचं व्यवस्थापन करण्याची हीच योग्य वेळ होती. गेली सहा सात वर्षे मी कर्णधारपद भूषवलं आहे. आम्ही एक संघ म्हणून खरंच चांगली कामगिरी केली आहे. मला माहिती आहे, या वर्ल्डकपमध्ये आमची कामगिरी चांगली झाली नाही. पण काही चांगले निकाल दिले आणि एकत्र खेळण्याचा आनंद लुटला. टी २० हा मार्जिनचा खेळ आहे. तुम्ही पहिल्या सामन्यांमध्ये क्रिकेटच्या दोन षटकांबद्दल बोलता आणि गोष्टी वेगळ्या असू शकतात. मी सांगितल्याप्रमामे आम्ही धाडसी नव्हतो. आम्ही नाणेफेकीचा कारण सांगणारा संघ नाही.”, असं विराट कोहलीने सांगितलं.