टी २० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना आहे. या सामन्यासाठी आजी माजी क्रिकेट आपल्या आवडत्या संघाला पसंती देत आहेत. कुणी न्यूझीलंड, तर कुणी ऑस्ट्रेलिया जिंकेल असं सांगत आहेत. भारतीय क्रीडाप्रेमी कोणत्या संघाला समर्थन द्यायचं, याबाबत द्वीधा मनस्थितीत आहेत. अशातच माजी क्रिकेटपटू वसिम जाफर यांनी एक मीम्स ट्वीट करत समर्थनाबाबतच सूचक वक्तव्य केलं आहे. वसिम जाफर यांचं हे ट्वीट वेगाने व्हायरल होत आहे. नेटकरी आपल्या शैलीत त्याखाली कमेंट्स करत आहेत. माजी क्रिकेटपटू वसिम जाफर यांनी जेठलाल यांचं मीम्स पोस्ट केलं आहे. यात जेठलालला प्रश्न पडला नेमकं कुणाला पाठिंबा द्यायचा?. शेवटी त्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर सापडतं.
पहिल्या फोटोत जेठालालला प्रश्न पडला आहे की, कुणाला पाठिंबा देऊ. दुसऱ्या फोटोत ऑस्ट्रेलियाचा विचार करताना स्वत:शीच बोलत आहे. की ऑस्ट्रेलियाने आपल्याला खूप जखमा दिल्या आहे. त्यानंतर तिसऱ्या फोटोत न्यूझीलंडला पाठिंबा देण्याचा विचार करतो. तेव्हा त्याला आठवतं. न्यूझीलंडने आपल्याला दिलेली जखम तर ताजी आहे. शेवटी या प्रश्नावर तोडगा काढत उत्तर मिळतं की, जो कुणी जिंकेल तोच खरा विजयी संघ असा निर्णय घेऊ.
टी-२० मधील रेकॉर्डची तुलना करता ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर वर्चस्व राखलं आहे. टी-२० मध्ये दोन्ही संघ आतापर्यंत १४ वेळा आमने-सामने आले आहेत. यामधील नऊ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले असून पाच सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला होता. टी २० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत एकच सामना झाला आहे. हा सामना न्यूझीलंडने जिंकला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकत रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी आहे. न्यूझीलंडने आतापर्यंत वेगवेगळ्या स्थितींमध्ये दाखवलेला संयम आणि खेळी पाहता तेच वर्ल्डकपचे विजेते ठरतील असं क्रिकेटप्रेमींना वाटत आहे.