टी २० वर्ल्डकपच्या अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया होत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर सन्मानजनक धावसंख्या उभारण्याचं आव्हान होतं. संघाच्या २८ धावा असताना डेरिल मिचेल बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन मैदानात उतरला. त्यामुळे गडी राखत मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान त्याच्यासमोर होतं. त्याने सुरुवातीला संथगतीने खेळत नंतर आक्रमक फटकेबाजी केली. त्यामुळे न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारता आली.
केन विल्यमसनने ४८ चेंडूत ८५ धावांची खेळी केली. या खेळीत १० चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. १३व्या षटकात विल्यमसनने आक्रमक पवित्रा धारण करत मॅक्सवेलला दोन षटकार खेचले. याच षटकात त्याने अर्धशतक पूर्ण केले. अंतिम फेरीत ५० हून अधिक धावा करणारा केन विल्यमसन दुसरा कर्णधार आहे. यापूर्वी लॉर्ड मैदानात २००९ च्या वर्ल्डकपमद्ये कुमार संगकाराने पाकिस्तान विरुद्ध खेळताना नाबाद ६४ धावांची खेळी केली होती.
न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला १७३ धावांचे आव्हान दिलं आहे. शेवटच्या षटकात न्यूझीलंडला १० धावा करता आल्या. २० षटकात न्यूझीलंडने ४ बाद १७२ धावा केल्या. नीशम १३ तर सेफर्ट ८ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियासाठी हेझलवूडने १६ धावांत ३ बळी घेतले.
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड.
न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, अॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट, ईश सोधी.