टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेमध्ये आज दुसरा सेमीफायनल सामना खेळवला जाणार आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. या मोठ्या सामन्यापूर्वी मोहम्मद रिझवान आणि शोएब मलिक या पाकिस्तानच्या दोन महत्त्वाच्या खेळाडूंच्या खेळण्याबाबत शंका होती. मात्र, आता हे दोन्ही खेळाडू तंदुरुस्त झाले असून आज होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यासाठी ते उपलब्ध असल्याची बातमी समोर आली आहे. या दोन्ही खेळाडूंनी फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे.
वृत्तानुसार, रिझवान आणि मलिक यांना ताप आला होता आणि ते दुबईत उपांत्य फेरीच्या पूर्वसंध्येला सराव सत्रासाठी आले नव्हते. या दोन्ही खेळाडूंची करोना चाचणी निगेटिव्ह आली असली, तरी उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळण्याबाबत शंका होती.
हेही वाचा – टीम इंडियामध्ये विराटची नवी भूमिका काय असणार?, सेहवाग म्हणतो, “त्याला आता…”
वैद्यकीय मंडळाच्या चाचणीनंतर मोहम्मद रिझवान आणि शोएब मलिक या दोघांनाही ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. पाकिस्तान संघाचे व्यवस्थापक मन्सूर राणा यांनी याआधी सांगितले होते की, दोन्ही खेळाडूंची तब्येत उत्तम आहे.
रिझवान आणि मलिक फलंदाजीसह उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत आणि ते पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनचा महत्त्वपूर्ण भाग आहेत. मोहम्मद रिझवानने या स्पर्धेत पाकिस्तानसाठी जबरदस्त योगदान दिले आणि त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे पाकिस्तानने सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीत धडक मारली. सध्याच्या स्पर्धेत संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये रिझवान दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने पाच सामन्यात २१४ धावा केल्या आहेत.