आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ कमनशिबी ठरल्याचं पाहायला मिळालं आहे. टी २० वर्ल्डकप (२०२१) स्पर्धेत अनेकांनी न्यूझीलंड संघाला पाठिंबा दर्शवला होता. दोन एकदिवसीय वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पराभव झाल्याने टी २०चा वर्ल्डकप न्यूझीलंड जिंकेल, अशी सर्वांना आशा होती. टी २० वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंड संघाचा सुपर १२ फेरीतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव झाला. मात्र त्यानंतर जोरदार कमबॅक केलं. भारत, नामिबिया, स्कॉटलंड आणि अफगाणिस्तानचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. तसेच यंदाच्या विश्वविजेतेपदाचा प्रमुख दावेदार असलेल्या इंग्लंड संघाला उपांत्य फेरीत मात दिली आणि अंतिम फेरी गाठली. मात्र अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला आणि पुन्हा एकदा आयसीसी वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं.

दुबईच्या मैदानावर रंगलेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ८ गड्यांनी धूळ चारत विश्वविजेतेपद मिळवले आहे. टी-२० प्रकारात प्रथमच ऑस्ट्रेलिया संघ विश्वविजेता ठरला. ऑस्ट्रेलियाचा कप्तान आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. केन विल्यमसनच्या वादळी ८५ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने २० षटकात ४ बाद १७२ धावा केल्या. सुरुवातीला संथ खेळणाऱ्या न्यूझीलंडला विल्यमसनचा आधार मिळाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने कोणताही दबाव न घेता दमदार फलंदाजी केली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श दमदार अर्धशतके ठोकली. १९व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मॅक्सवेलने चौकार ठोकत ऑस्ट्रेलियाचे स्वप्न पूर्ण केले. सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला, तर न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव केला. दोन्ही संघांचे उपांत्य फेरीचे सामने अतिशय रोमांचक ठरले होते. मिचेल मार्शला सामनावीर, तर डेव्हिड वॉर्नरला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

गेल्या ६ वर्षात न्यूझीलंडचा संघाने आयसीसी स्पर्धेच्या ४ अंतिम फेरी गाठल्या. त्यापैकी फक्त एका स्पर्धेत विजय मिळवण्यात यश आलं.एकदिवसीय वर्ल्डकप (२०१५) स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामना झाला होता. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला पराभूत केलं होतं. त्यानंतर एकदिवसीय वर्ल्डकप (२०१९) स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. न्यूझीलंडचा या स्पर्धेत इंग्लंडशी सामना झाला. मात्र सामना अनिर्णित ठरला. त्यानंतर दोन सुपर ओव्हरमध्ये सामना अनिर्णित ठरला आणि चौकारांवर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. कसोटी चॅम्पियनशिपचा पहिलीवहिला चषक जिंकण्यात न्यूझीलंडला यश आलं. भारताला पराभूत करत न्यूझीलंडने चषकावर नाव कोरलं होतं.

Story img Loader