आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१चा दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तान संघाने ऑस्ट्रेलियाला १७७ धावांचे लक्ष्य दिले. जे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी १९ षटकांत पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने १७ चेंडूत ४१ धावांची सर्वोत्तम खेळी खेळली आणि तो सामनावीर ठरला. आता त्यांना न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामना खेळायचा आहे.

या सामन्यानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि मीम्स व्हायरल झाले. मात्र यात असा एक व्हिडिओ आहे, जो बाकीच्यांपेक्षा खूप वेगळा आहे. त्याचे कारण म्हणजे एक ऑस्ट्रेलियन चाहता ‘भारत माता की जय’ आणि वंदे मातरमच्या घोषणा देत आहे. या चाहत्याने अंगावर पिवळ्या रंगाची जर्सी घातली आहे.

हेही वाचा – T20 WC: वॉर्नर आऊट होता की नव्हता? सामनावीर वेडचा खुलासा; म्हणाला, “नॉन-स्ट्राइकवर असलेल्या मॅक्सवेलनं…”

व्हिडिओमागील सत्यता..

दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये या चाहत्याकडून ‘भारत माता की जय’ आणि वंदे मातरम्च्या घोषणा देण्यात आल्या, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. मात्र हा चुकीचा आहे. भारताच्या मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील हा व्हिडिओ आहे. या दौऱ्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारताने गाबा कसोटी जिंकली होती, त्यावेळचा हा व्हिडिओ आहे.

असा रंगला सामना…

टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने सुसाट पाकिस्तानचा विजयीरथ रोखत अंतिम फेरीत धडक दिली आहे. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉइनिसने पाकिस्तानच्या तोंडचा विजयी घास हिरावत ऑस्ट्रेलियाला ५ गडी राखून विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाचा कप्तान आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने कोणताही दबाव न घेता २० षटकात ४ बाद १७६ धावा केल्या. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांची उत्तम सुरुवात, तर सूर गवसलेल्या फखर जमानच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला तंगवले. रिझवानने ६७ तर जमानने नाबाद ५५ धावा कुटल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने फिंच, स्मिथ आणि मॅक्सवेलला स्वस्तात गमावले. पण डेव्हिड वॉर्नर, वेड आणि स्टॉइनिस यांनी झुंजार फलंदाजी करत १९व्या षटकात विजय मिळवला. १९व्या षटकात लागोपाठ तीन षटकार ठोकणाऱ्या वेडला सामनावीर पुरस्कार मिळाला. आता या स्पर्धेला नवा विश्वविजेता मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया आता १४ नोव्हेंबरला विजेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडशी भिडणार आहे.

Story img Loader