टी २० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १७७ धावांचं आव्हान दिलं आहे. पाकिस्ताननं ४ गडी गमवून १७६ धावा केल्या. वर्ल्डकपमध्ये हॅटट्रीक, धावांचा पाऊस असे नवनवे विक्रम प्रस्थापित होत असताना एक अजब प्रकार घडला. पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिजने अजब नो बॉल टाकल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने संघाचं आठवं षटक फिरकीपटू मोहम्मद हाफिजला सोपवलं. या षटकातला पहिला चेंडू टाकतान वर्ल्डकप इतिहासात एक घटना नोंदवली गेली. हाफीजने षटकाचा पहिलाच चेंडू नो बॉल टाकला. हा चेंडू लाइन क्रॉस केल्याने नाही, तर दोन टप्पा टाकल्याने दिला गेला. या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेविड वॉर्नरने उंच षटकार ठोकला. त्यामुळे एका चेंडूवर ७ धावा आल्या. हा चेंडू नो होता का?, याबाबत मोहम्मद हाफिजने पंचांना विचारणा केली. तेव्हा पंचांनी दोन टप्पा टाकल्याने नो दिल्याचं सांगितलं. नशिबाने पुढच्या फ्रि हिट चेंडूवर २ धावा आल्या.
पाकिस्तानचा डाव
कप्तान बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी आपल्या फलंदाजीतील सातत्य कायम राखत पाकिस्तानला उत्तम सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी सातव्या षटकात पाकिस्तानने अर्धशतक फलकावर लावले. बाबरने आक्रमक तर रिझवानने संयमी पवित्रा धारण करत धावफलक हलता ठेवला. १०व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झम्पाने बाबरला झेलबाद केले. बाबरने ५ चौकारांसह ३९ धावा केल्या. बाबर-रिझवान यांनी पहिल्या गड्यासाठी ७१ धावा केल्या. बाबरनंतर फखर झमान मैदानात आला. स्पर्धेत चांगल्या फॉर्मात नसलेल्या जमानला आज सूर गवसला. त्याने रिझवानसोबत अर्धशतकी भागीदारी रचली. १४व्या षटकात ऱिझवानने संघाचे शतक आणि आपले अर्धशतर फलकावर लावले. रिझवानचे हे स्पर्धेतील तिसरे अर्धशतक ठकले. एका कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १००० धावा करणारा रिझवान पहिला क्रिकेटपटू ठरला. १८व्या षटकात रिझवान स्टार्कचा बळी ठरला. त्याने ३ चौकार आणि ४ षटकारांसह ६७ धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तानने आसिफ अली आणि शोएब मलिकला स्वस्तात गमावले. शेवटच्या षटकात जमानने स्टार्कला लागोपाठ दोन उत्तुंग षटकार ठोकत आपले अर्धशतक फलकावर लावले. या षटकात पाकिस्तानने १५ धावा वसूल केल्या. २० षटकात पाकिस्तानने ४ बाद १७६ धावा केल्या. जमानने ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ५५ धावा केल्या.