दोन षटकात २४ धावांची गरज…एकाच षटकात चार षटकार….फलंदाजाचे नाव आसिफ अली. टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत शुक्रवारचा दिवस क्रिकेटरसिंकांसाठी मनोरंजक ठरला. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशला अखेरच्या चेंडूवर नमवले. तर दुसऱ्या थरारक सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानला मात दिली. मोक्याच्या क्षणी पाकिस्तानचे प्रमुख फलंदाज बाद झाल्यामुळे अफगाणिस्तानला विजयाचा सुंगध येऊ लागला. पण आसिफ अलीने वादळी खेळी करत त्यांचे स्वप्न धुळीस मिळवले.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या दोन षटकात २४ धावांची गरज होती. पाकिस्तानचे ५ गडी तंबूत परतल्यामुळे आसिफ अली आणि शादाब खान हे नवीन फलंदाज खेळपट्टीवर आले. १९वे षटक जलदगती गोलंदाज करिम जनतने टाकले. न्यूझीलंडविरुद्धच्या मागील सामन्यात १२ चेंडूत २७ धावा (३ षटकार, एक चौकार) ठोकलेल्या आसिफ अलीवर सर्वांच्या नजरा होत्या. या सामन्यातही त्याने पहिल्या तिसऱ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर षटकार ठोकत दिवाळीपूर्वीच फटाके फोडले.
हेही वाचा – T20 WC : “न्यूझीलंडला हरवायचं असेल तर…”, गावसकरांचा ‘या’ दोघांना संघाबाहेर करण्याचा सल्ला!
भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर, इरफान पठाण आणि हरभजन सिंग यांनीही आसिफ अलीची फलंदाजी पाहून ट्वीट केले आहे. क्रिकेट समालोचक हर्षा भोगले आसिफला पाहून भारावले.
असा रंगला सामना…
पाकिस्तानने अफगाणिस्तानला ५ गड्यांनी मात देत विजयी हॅट्ट्रिक नोंदवली आहे. शेवटच्या २ षटकात २४ धावांची गरज असताना पाकिस्तानच्या आसिफ अलीने एका षटकात ४ षटकार ठोकून सामना जिंकवून दिला. दुबईच्या मैदानावर अफगाणिस्तानचा कप्तान मोहम्मद नबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या पडझडीनंतर कप्तान मोहम्मद नबी आणि गुलबदिन नैब यांनी केलेल्या नाबाद ७१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर अफगाणिस्तानने २० षटकात ६ बाद १४७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानी कप्तान बाबर आझमने अर्धशतक ठोकले, तर आसिफ अलीने ७ चेंडूत नाबाद २५ धावा केल्या. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. पाकिस्तानने या विजयासह उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे.