टी २० वर्ल्डकपमधील भारत विरूद्धचा सामना पाकिस्तानसाठी प्रतिष्ठेचा झाला होता. आतापर्यंतच्या इतिहासात पाकिस्तानला कधीच भारताला पराभूत करता आलं नव्हतं. त्यामुळे सामन्यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी पाकिस्तान संघाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. बाबर आझमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत भारताला मात देत नव्या इतिहासाची नोंद केली आहे. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला. वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्ताने भारताला पहिल्यांदाच मात दिली आहे. या विजयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच ट्वीट करत पाकिस्तान संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
“पाकिस्तान संघाचं अभिनंदन, विशेष म्हणजे बाबर आझमचं. त्याने सलामीला येत चांगली खेळी केली. त्याचबरोबर रिझवान आणि शाहिन आफ्रिदीने चांगली कामगिरी केली. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे.”, असं ट्वीट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं आहे. कप्तान बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने पाकिस्तानसाठी उत्तम सुरुवात केली. भुवनेश्वरने भारतासाठी पहिले षटक टाकले. या षटकात पाकिस्तानने बिनबाद १० धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये भारताला विकेट मिळवण्यात अपयश आले. ६ षटकात पाकिस्तानने बिनबाद ४३ धावा केल्या. पॉवरप्लेनंतर रिझवान आणि बाबरने आक्रमक खेळायला सुरुवात केली. १३व्या षटकात बाबरने वरुण चक्रवर्तीला शानदार षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. याच षटकात पाकिस्तानने शंभरी ओलांडली. बाबरपाठोपाठ रिझवाननेही बुमराहला चौकार ठोकत आपले अर्धशतक साजरे केले. त्याचे हे भारताविरुद्ध पहिले अर्धशतक ठरले. १८व्या षटकात पाकिस्ताने विजयावर शिक्कामोर्तब केले. बाबरने ६ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावा, तर रिझवानने ६ चौकार आणि ३ षटकारांसह ७९ धावा केल्या.
इम्रान खान यांच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघही भारताला विश्वचषकात हरवू शकला नव्हता. विशेष गोष्ट म्हणजे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानसाठी हरवण्याचा सिलसिला १९९२ मध्ये सुरू झाला होता. त्यावेळी इम्रान खान कर्णधार होते. त्यानंतर टीम इंडियाने एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानला ७ वेळा पराभूत केले होते. याशिवाय टी-२० विश्वचषकातही पाकिस्तानला भारताच्या हातून ५ वेळा पराभूत व्हावे लागले आहे.