टी २० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत केलं आणि भारतात दिवाळी साजरी करण्यात आली. सुपर १२ फेरीतील पहिल्या सामन्यात पाकिस्ताननं भारताला १० गडी राखून पराभूत केलं होतं. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमी नाराज झाले होते. त्यात पाकिस्तानची सुपर १२ फेरीत विजयी घोडदौड सुरूच होती. यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये निराशेचे वातावरण होतं. मात्र पाकिस्तानचा उपांत्य फेरीत पराभव होताच सोशल मीडियावर मीम्सना उधाण आलं आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी फटाके फोडून दिवाळी साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला.

नेटकरी सोशल मीडियावर फटाके फोडल्याचे व्हिडिओ शेअर करत आहेत. तसेच मजेशीर कमेंट्स देत पाकिस्तानी चाहत्यांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी, सुपर १२ फेरीत पाकिस्ताननं भारताला पराभूत केल्याने काही ठिकाणी फटाके फोडल्याने माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी नाराजी व्यक्त केली होती.

टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने सुसाट पाकिस्तानचा विजयीरथ रोखत अंतिम फेरीत धडक दिली आहे. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉइनिसने पाकिस्तानच्या तोंडचा विजयी घास हिरावत ऑस्ट्रेलियाला ५ गडी राखून विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाचा कप्तान आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने कोणताही दबाव न घेता २० षटकात ४ बाद १७६ धावा केल्या. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांची उत्तम सुरुवात, तर सूर गवसलेल्या फखर जमानच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला तंगवले. रिझवानने ६७ तर जमानने नाबाद ५५ धावा कुटल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने फिंच, स्मिथ आणि मॅक्सवेलला स्वस्तात गमावले. पण डेव्हिड वॉर्नर, वेड आणि स्टॉइनिस यांनी झुंजार फलंदाजी करत १९व्या षटकात विजय मिळवला. १९व्या षटकात लागोपाठ तीन षटकार ठोकणाऱ्या वेडला सामनावीर पुरस्कार मिळाला. आता या स्पर्धेला नवा विश्वविजेता मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया आता १४ नोव्हेंबरला विजेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडशी भिडणार आहे.

Story img Loader