टी २० वर्ल्डकपमधील भारताचं उपांत्य फेरीचं स्वप्न भंगलं आहे. न्यूझीलंडने अफगाणिस्तानला नमवत ८ गुणांसह उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे भारताचा नामिबियासोबतचा सामना केवळ औपचारिकता असणार आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरीत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यान सामना रंगणार आहे. ग्रुप १ मधून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया, तर ग्रुप २ मधून पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आता पाकिस्तान आणि स्कॉटलंड सामन्यानंतर कोणता संघ कोणत्या संघाशी लढत देणार हे स्पष्ट होईल.
इंग्लंडने ५ पैकी ४ सामने जिंकत ८ गुण आणि +२.४६४ धावगतीसह पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाही ५ पैकी ४ सामने जिंकत ८ गुण आणि +१.२१६ धावगतीसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर ग्रुप २ मध्ये न्यूझीलंडची धावगती पाकिस्तानपेक्षा चांगली आहे. मात्र पाकिस्तानचा स्कॉटलंडसोबतचा सामना झाल्यानंतर कोणता संघ कुणाशी लढणार हे स्पष्ट होईल.
आतापर्यंत टी २० वर्ल्डकप जिंकलेले संघ
- भारत २००७
- पाकिस्तान २००९
- इंग्लंड २०१०
- वेस्ट इंडिज २०१२
- श्रीलंका २०१४
- वेस्ट इंडिज २०१६
उपांत्य फेरीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघाने आतापर्यंत टी २० वर्ल्डकप जिंकलेला नाही. त्यामुळे यंदा नवा विश्वविजेता मिळणार की एक संघ दोनदा चषकावर नाव कोरेल हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.