टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा संघ चांगला फॉर्मात आहे. सुपर १२ फेरीतील सलग ५ सामने जिंकत पाकिस्ताननं उपांत्य फेरीत स्थान मिळवलं आहे. उपांत्य फेरीत पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्यातील विजयी संघाचा अंतिम फेरीत न्यूझीलंडशी सामना होणार आहे. मात्र पाकिस्तानच्या गोटात सध्या चिंतेचं वातावरण आहे. फॉर्मात असलेल्या शोएब मलिक आणि मोहम्मद रिझवानला ताप आला आहे. त्यामुळे दोघांनी सराव शिबिरात भाग घेतला नाही. सरफराज अहमद आणि हैदर अली यांना या दोघांच्या रिप्लेसमेंटसाठी तयार करण्यात आलं आहे, असं पाकिस्तानी मीडियाचं म्हणणं आहे. दुसरीकडे शोएब मलिक आणि मोहम्मद रिझवानची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र डॉक्टरांनी दोघांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. दोघांबाबत सामन्यापूर्वी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानची चिंता वाढली आहे.

मोहम्मद रिझवान आणि शोएब मलिक दोघंही सध्या चांगल्या फॉर्मात आहेत. शोएब मलिकने स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात १८ चेंडूत ५४ धावांची नाबाद खेळी केली होती. मोहम्मद रिझवानने भारताविरुद्ध नाबाद ७९, नामिबियाविरुद्ध ७९ धावांची खेळी केली होती.

पाकिस्ताननं सुपर १२ फेरीत भारत, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंडला पराभूत केलं आहे. त्यामुळे पाकिस्तान टी २० वर्ल्डकपचा मुख्य दावेदार मानलं जात आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया सुपर १२ फेरीत ४ सामने जिंकत उपांत्य फेरीत पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत एकही टी २० वर्ल्डकप जिंकलेला नाही. तर पाकिस्तानने एक चषक जिंकला आहे.