टी २० वर्ल्डकपमध्ये भारताने अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने हरवल्याने भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा वाढल्या आहेत. मात्र उपांत्य फेरीच्या आशा इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून आहेत. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान सामन्यावर भारतीय संघाचं गणित अवलंबून आहे. या सामन्यानंतरच भारताचं उपांत्य फेरीचं गणित सुटणार आहे. अफगाणिस्तानने न्यूझीलंडला कमी फरकाने हरवल्यास भारताचा मार्ग मोकळा होणार आहे. गट २ मध्ये पाकिस्तानचा संघ सलग चार सामने जिंकत अव्वल स्थानी आहे. तर धावगती चांगली असल्याने अफगाणिस्तानचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. तर दोन विजय मिळवल्याने न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. आता अफगाणिस्तानच्या फिरकीपटू राशीद खानने न्यूझीलंडविरुद्धचा सामना उपांत्यपूर्व फेरीसारखा खेळणार असल्याचं सांगितलं आहे.

भारताकडून पराभव स्वीकारावा लागल्याने अफगाणिस्तानच्या कामगिरीवर काही परिणाम जाणवेल का?, असा प्रश्न राशीद खानला विचारण्यात आला. त्यावर राशीद खानने आपल्या अंदाजात उत्तर दिलं. “मला वाटत नाही यामुळे काही फरक पडेल. आम्हाला माहिती आहे भारत एक चांगल्या संघांपैकी एक आहे. आम्ही त्याच पद्धतीची तयारी करू आणि मानसिकतेने मैदानात उतरू. न्यूझीलंड विरुद्धचा सामना उपांत्यपूर्व फेरीसारखा असणार आहे. आम्ही जिंकलो तर चांगल्या धावगतीसह उपांत्य फेरीत पोहोचू शकतो”, असं राशीद खानने सांगितलं.

T20 WC: अनिल कपूरच्या गाण्यावर विराट कोहलीचा ‘झक्कास’ डान्स; व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र उपांत्य फेरीमध्ये जाणारा दुसरा संघ कोण यासाठी तीन संघांची दावेदारी कायम आहे. पण यामध्येही भारताला जर तरच्या आधारावर उपांत्य फेरी गाठता येणार आहे. म्हणजे सामन्याचे काही ठराविक निकाल लागले तर ग्रुप स्टेजमधील सर्व सामने संपल्यानंतर भारत, न्यूझीलंड, अफगाणिस्तानचे प्रत्येकी सहा गुण होण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानच्या संघाने चार सामने खेळले असून त्यांनी दोन सामने जिंकलेत दोन गमावले आहेत. त्यामुळेच त्यांचे एकूण चार गुण असून नेट रनरेट +१.४८१ इतका आहे. त्यांचे उर्वरित सामने हे न्यूझीलंड आणि स्कॉटलंडविरुद्धचा सामना बाकी आहे. यापैकी त्यांनी न्यूझीलंडच्या सामन्यात विजय मिळवल्यास भारताला फायदा होईल. कारण असं झाल्यास अफगाणिस्तानचेही सहा गुण होती आणि उरलेला एक सामना जिंकून न्यूझीलंडही सहा गुणांपर्यंतच मजल मारु शकेल. न्यूझीलंडने आतापर्यंत तीन सामने खेळले असून तीन पैकी त्यांनी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवलाय. भारत आणि स्कॉलंडला त्यांनी पराभूत केलं आहे तर पाकिस्तानकडून त्यांचा पराभव झालाय. त्यांचा नेट रनरेट हा +०.८१६ इतका आहे. त्यामुळे तिसऱ्या स्थानी आहेत. अफगाणिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्यास त्यांचं उपांत्य फेरीचं तिकीट निश्चित होणार आहे. कारण त्यांचा उर्वरित एक सामना दुबळ्या नामिबियासोबत असणार आहे.