टी २० वर्ल्डकपमधील सुपर १२ फेरीत दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा ४ गडी आणि १ चेंडू राखून पराभव केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम आहेत. तर श्रीलंकेचं पुढची वाटचाल कठीण झाली आहे. ग्रुप १ मध्ये बांगलादेशने तिन्ही सामने गमवल्याने त्यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. तर गजविजेता वेस्ट इंडिज संघाचं उपांत्य फेरीत जाण्याचं स्वप्न जर तर वर अवलंबून आहे.

दक्षिण आफ्रिकेचा डाव

श्रीलंकेनं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे दोन सलामीचे फलंदाज चौथ्या षटकात माघारी परतले. क्विंटन डिकॉक १२, तर रीझा हेन्ड्रिक्स ११ धावा करून तंबूत परतला. दुशमंथा चमीराच्या गोलंदाजीवर दोघंही बाद झाले. त्यानंतर रस्सी वॅनदर दुस्सेन धावचीत होत तंबूत परतला. त्याने ११ चेंडूत १६ धावा केल्या. त्यानंतर कर्णधार टेम्बा बवुमा आणि एडन मारक्रम यांनी चांगली खेळी केली. मारक्रम १९ धावांवर असताना वनिंदू हसरंगाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. तर बवुमा ४६ धावांवर बाद झाला. तर ड्वेन प्रेटोरिअस शून्यावर बाद झाल्याने दडपण आलं होतं. पण शेवटच्या षटकापर्यंत आलेल्या सामन्यात डेविड मिलारने दोन षटकार मारून सामना फिरवला आणि विजय मिळवून दिला.

श्रीलंकेचा डाव

श्रीलंकेला कुसल परेराच्या रुपाने पहिला धक्का बसला. संघाच्या २० धावा असताना कुसल परेरा अनरिच नोर्तजेच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर दुसऱ्या गड्यासाठी पथुम आणि चरिथ असलंकाची जोडी चांगली जमली. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ४१ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी चरिथ धावचीत झाल्याने मोडली. कगिसो रबाडाने चरिथ २१ धावांवर असताना त्याला धावचीत केलं. त्यानंतर आलेला भानुका राजपक्षेही जास्त काळ मैदानात तग धरू शकला नाही. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. तबरेजने स्वत:च्या गोलंदाजीवर त्याचा झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला. एका बाजूने पथुमने आपली झुंज सुरुच ठेवली होती. त्याने ५८ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. अविष्का फर्नांडो (३), वनिंदू हसरंगा (४), दासुन शनाका (११), चमिका करुणारत्ने (५). धुसमंथा चमीरा (३) अशा धावा करून तंबूत परतले.

ब्लॅक लाईव्ह्स मॅटर प्रकरणात मैदानात गुडघ्यावर बसण्यात नकार दिल्याने मागच्या सामन्यात डिकॉकला संघाबाहेर करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा डिकॉकला संघात स्थान देण्यात आलं आहे. क्लास्सेनच्या जागेवर त्याची प्लेईंग इलेव्हनमध्ये वर्णी लागली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ- टेम्बा बवुमा (कर्णधार), क्विंटन डिकॉक, रीझा हेन्ड्रिक्स, एडन मारक्रम, रस्सी वॅनदर डुस्सेन, डेविड मिलार, ड्वेन प्रेटोरिअस, कासिगो रबाडा, केशव महाराज, अनरिच नार्तजे, तबरेज शम्सी

श्रीलंकेचा संघ- पथुम निस्सांका, कुसल परेरा, चरिथ असलंका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, दासुन शनाका, चमिका करुणारत्ने, वनिंदू हसरंगा, दुशमंथा चमीरा, महीश थीकशना, लहिरु कुमारा