टी २० वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीचा गुंता कायम आहे. उपांत्य फेरीचं गणित दुसऱ्या संघाच्या कामगिरीवर असल्यानं सोशल मीडियावर नेटकरी मजेशीर ट्वीट शेअर करत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटूही यात मागे नाही. सूचक मीम्स शेअर करत वसीम जाफरने भारत आणि ऑस्ट्रेलियाचं उपांत्य फेरीचं गणित मांडलं. नेटकरीही या मीम्स पसंती देत आहेत. बॉलिवूड चित्रपट धमाल यातील एक दृष्य आहे. ग्रुप १ मध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि ग्रुप २ मध्ये न्यूझीलंड, भारत आणि अफगाणिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहेत.
“सध्याची स्थिती: भारत आणि ऑस्ट्रेलियाला फक्त विजयच नाही तर अफगाणिस्तान आणि इंग्लंडचा विजयही महत्त्वाचा आहे.”, असं कॅप्शन लिहित हॅशटॅग टी २० वर्ल्डकप टाकलं आहे.
टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताचा समावेश असणाऱ्या दुसऱ्या गटामध्ये सामन्यांच्या निकालाबरोबरच गुणतालिका म्हणजेच पॉइण्ट टेबलचीही तुफान चर्चा आहे. या गटामध्ये प्रत्येक सामन्याला संघाचं स्थान बदलताना दिसत आहे. पाकिस्तानने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला असला तरी उपांत्यफेरीत जाणारा दुसरा संघ कोण ही चुरस कायम आहे. दुसऱ्या स्थानासाठी भारताबरोबरच अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडचा संघ दावेदार आहे. त्यामुळेच प्रत्येक सामन्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करुन उरलेल्या त्या एका स्थानी आपल्या संघाचं नाव असावं म्हणून तिन्ही संघ जीव ओतून खेळताना दिसत आहेत. मात्र शुक्रवारी झालेल्या दोन्ही सामन्यांचा प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष फायदा भारतालाच झालाय. भारताने अवघ्या ३९ चेंडूंमध्ये लक्ष्य काढून स्कॉटलंडला पराभूत करण्याबरोबरच आपल्या नेट रन रेटमध्ये चांगली सुधारणा केलीय. तर दुसरीकडे नामिबियाविरुद्धचा सामना जिंकूनही न्यूझीलंडचा नेट रन रेट सुधारण्यात यश आलेलं नाही.