टी २० वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीची चुरस रंगतदार वळणावर आली आहे. ग्रुप २ मधून पाकिस्ताननं आपलं स्थान उपांत्य फेरीत निश्चित केलं आहे. मात्र दुसऱ्या संघासाठी न्यूझीलंड, भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चुरस आहे. त्यामुळे उपांत्य फेरीचं गणितं न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान सामन्यावर अवलंबून आहेत. न्यूझीलंडने हा सामना जिंकल्यास थेट उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. मात्र अफगाणिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागल्यास उपांत्य फेरीसाठी धावगती महत्वाची ठरणार आहे. या सामन्याबाबत माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने आपलं मत व्यक्त करत न्यूझीलंड संघाला डिवचलं आहे. न्यूझीलंड हा सामना हरल्यास खूप प्रश्न उपस्थित होतील आणि सोशल मीडियावर लोकांना आवरणं कठीण होईल.
“जर न्यूझीलंड हा सामना हरली तर खूप सारे प्रश्न उपस्थित होतील. मी हा इशारा आधीच देत आहे. मला भीती आहे की, टॉप ट्रेण्डिंगमध्ये आणखी एक गोष्ट सुरु होईल. असो, मी या वादात पडू इच्छित नाही. मात्र न्यूझीलंडसाठी पाकिस्तानमध्ये तीव्र भावना आहेत.”, असं शोएब अख्तरने सांगितलं. “न्यूझीलंड एक चांगला संघ असून अफगाणिस्तानला पराभूत करू शकतो. जर ते चांगले खेळले नाहीत. तर मात्र एक समस्या होईल. सोशल मीडियाला थांबवू शकत नाही. कुणी काहीच बोलू शकत नाही. भारताने स्पर्धेत कमबॅक केल्याने स्पर्धेला जिवंतपणा येईल. पुन्हा एकदा भारत पाकिस्तान सामना होऊ शकतो. संपूर्ण जग हा सामना पाहू इच्छिते.”, असं शोएब अख्तरने पुढे सांगितलं.
न्यूझीलंडने पाकिस्तान दौरा रद्द केल्याची सळ अजून पाकिस्तानी खेळाडूंच्या मनात कायम आहे. यामुळे पाकिस्तानचे आजी माजी खेळाडू न्यूझीलंडला डिवचण्याची एकही संधी सोडत नाही. सुरक्षेचं कारण देत न्यूझीलंडने पाकिस्तान दौरा रद्द केला होता. न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात तीन एकदिवसीय आणि पाच टी २० सामन्यांची मालिका खेळली जाणार होती. शेवटच्या क्षणी न्यूझीलंडने माघार घेतल्याने पाकिस्तानची नाचक्की झाली आहे.