टी २० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघात होणार आहे. स्पर्धेतील इंग्लंड संघाचा कामगिरी पाहता पारडं जड मानलं जात आहे. दोन्ही संघांनी सुपर १२ फेरीत प्रत्येकी ४ सामने जिंकत उपांत्य फेरीत स्थान मिळवलं आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट याने प्रतिक्रिया दिली आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडला मात देऊ, असा विश्वास ट्रेन्ट बोल्टने व्यक्त केला आहे. ब्लॅककॅप्स या सोशल मीडिया पेजवर बोलताना ट्रेन्ट बोल्टने उपांत्य फेरीबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

“माझ्या मते आम्हाला आता पुन्हा नव्याने सुरुवात करायला हवी. स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात आम्हाला एका चांगल्या संघाचा सामना करायचा आहे. आतापर्यंत आम्ही सर्व खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन केलं आहे, ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे. त्यामुळे हा सामना रोमांचक होईल.”, असं ट्रेन्ट बोल्टने सांगितलं. ट्रेन्ट बोल्ट याने इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात २०१९ वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्याचा उल्लेखही केला. “इंग्लंड संघात सर्वच मॅच विनर खेळाडू आहेत. या वेळेसही ते चांगलं खेळत आहे. आशा आहे की, आम्ही एक मोठा उलटफेर करू शकतो. मागच्या काही वर्षात दोन्ही संघांचा इतिहास चांगला आहे.”, असंही ट्रेन्ट बोल्ट याने सांगितलं.

इंग्लंड आणि न्यूझीलंड २०१९ वर्ल्डकपमध्ये आमनेसामने आली होती. या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवत किताब जिंकला होता. दोन वेळा हा सामना अनिर्णित ठरला होता. त्यानंतर चौकाराच्या आधारावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं होतं.

Story img Loader