टी २० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. न्यूझीलंडने अफगाणिस्तानला हरवल्यानंतर टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं स्वप्न भंगलं आहे. त्यामुळे नामिबियाविरुद्ध असलेल्या शेवटचा आणि औपचारिक सामना खेळण्यास टीम इंडिया मैदानात उतरली आहे. या सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू दंडाला काळी रिबन बांधून मैदानात खेळत आहेत. भारताला कित्येक आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटपटू देणाऱ्या प्रसिद्ध प्रशिक्षक तारक सिन्हा यांचं निधन झाल्यानंतर खेळाडूंनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. ७१ वर्षीय तारक सिन्हा यांचं दीर्घ आजारामुळे दिल्लीत निधन झालं.

देशाला प्रतिभावंत क्रिकेटपटू देण्याऱ्या सोनेट क्लबची स्थापना तारक सिन्हा यांनी केली होती. त्यांच्या देखरेखीखाली प्रशिक्षण घेणारे खेळाडू त्यांना उस्ताद जी म्हणून संबोधत असत. त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिग्गज सुरिंदर खन्ना, मनोज प्रभाकर, दिवंगत रमन लांबा, अजय शर्मा, अतुल वासन, संजीव शर्मा या खेळाडूंना घडवलं. त्यानंतर आकाश चोप्रा, अंजुम चोप्रा, रुमेली धर, आशीष नेहरा, शिखर धवन आणि ऋषभ पंत सारखे खेळाडू टीम इंडियाला दिले.

भारत आणि नामिबिया यांच्यातील टी-२० विश्वचषकाच्या सुपर-१२ टप्प्यातील अंतिम सामना दुबईत होत आहे. टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून भारत बाहेर पडला आहे. त्यामुळे विराटसेना या सामन्याने गोड शेवट करण्यास उत्सुक आहे. विराटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकी गोलंदाजीपुढे नामिबियाचे फलंदाज अपयशी ठरले. २० षटकात नामिबियाला ८ बाद १३२ धावा करता आल्या. जडेजा आणि अश्विन यांनी प्रत्येकी ३ तर बुमराहने २ बळी घेत नामिबियाला तंगवले. गट २ मधून पाकिस्तान आणि न्यूझीलंडने बाद फेरीत प्रवेश केला. सुपर-१२ टप्प्यातील सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव करताच भारताच्या आशा मावळल्या. गट १ मधून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पोहोचले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विराट कोहलीचा भारतासाठी टी-२० कप्तान म्हणून हा शेवटचा सामना आहे.