भारतीय संघाने २०२४ च्या टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. २९ जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत भारताने तब्बल १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. या विजयानंतर भारतीय संघ आज (४ जुलै) भारतात परतला आहे. यावेळी भारतीय संघाचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे. दिल्ली विमानतळावर चाहत्यांकडून स्वागतासाठी मोठी गर्दी करण्यात आली होती.
भारतीय संघ सध्या दिल्लीत पोहोचला आहे. थोड्याच वेळात भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय संघाबरोबर संवाद साधण्याची शक्यता आहे. यानंतर संपूर्ण भारतीय संघ मुंबईकडे रवाना होणार आहे. भारतीय संघाने २०२४ च्या टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावल्याच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी ५ वाजता भारतीय संघाचं मुंबईत जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यासाठी मोठी तयारी करण्यात आलेली आहे.
हेही वाचा : दिग्विजयाचा आज मुंबईत जल्लोष; ट्वेन्टी२० विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या मिरवणुकीचे आयोजन
Men's Indian Cricket Team lands at Delhi airport after winning the #T20WorldCup2024 trophy.
— ANI (@ANI) July 4, 2024
(Source: Delhi Airport) pic.twitter.com/kaCCjYy2oM
भारतीय संघ बुधवारी ग्रँटली अॅडम्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विशेष विमानाच्या साहाय्याने दिल्लीला दाखल झाला. यावेळी विमानतळावर चाहत्यांकडून स्वागतासाठी मोठी गर्दी करण्यात आली होती. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माकडे टी-२० विश्वचषकाची ट्रॉफी होती. दिल्ली विमानतळावरून भारतीय संघ आयटीशी मौर्या हॉटेलमध्ये दाखल झाला. दरम्यान, भारतीय संघ दिल्लीत पोहचताच चाहत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
It's home ? #TeamIndia pic.twitter.com/bduGveUuDF
— BCCI (@BCCI) July 4, 2024
मुंबईत मिरवणुकीचे आयोजन
ट्वेन्टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाची आज मुंबईत विजयी मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. मरिन ड्राइव्हपासून (एनसीपीए) खुल्या बसमध्ये विजयी मिरवणुकीचे (रोड शो) आयोजन करण्यात येईल आणि नंतर खेळाडूंना घोषित १२५ कोटी रुपयांच्या पुरस्काराच्या रकमेने सन्मानित करण्यात येईल, असे ‘बीसीसीआय’ उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले आहे.