टी-२० विश्वचषक २०२१च्या सुपर-१२ टप्प्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला ७ गडी राखून पराभवाचे पाणी पाजले आहे. मागील काही कालावधीपासून टीका होत असलेल्या डेव्हिड वॉर्नरला अखेर सूर गवसला असून त्याने लंकेविरुद्ध दमदार अर्धशतकी खेळी केली. दुबईच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पॉवरप्लेमध्ये चरिथ असलंका, कुसल परेरा आणि शेवटी भानुका राजपक्षेच्या महत्त्वपूर्ण खेळीमुळे लंकेने ऑस्ट्रेलियाला १५५ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात वॉर्नर आणि फिंच यांनी ७० धावांची सलामी दिली. त्यानंतर स्मिथ आणि मार्कस स्टॉइनिसने १७व्या षटकात विजयावर शिक्कामोर्तब केले. फिरकीपटू अॅडम झम्पाला सामनावीर पुरस्कार मिळाला.

ऑस्ट्रेलियाचा डाव

डेव्हिड वॉर्नर आणि अॅरॉन फिंच यांनी ७० धावांची आक्रमक सलामी दिली. फिरकीपटू हसरंगाने सातव्या षटकात फिंचा बाद करत लंकेला पहिले यश मिळवून दिले. फिंचने ५ चौकार आणि २ षटकारांसह ३७ धावा केल्या. त्यानंतर लंकेला ग्लेन मॅक्सवेलच्या रुपात दुसरे यश मिळाले. दुसरीकडे वॉर्नरने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. त्याने १० चौकारांसह ६५ धावा केल्या. दासुन शनाकाने त्याला तंबूत पाठवले. त्यानंतर स्टीव्ह स्मिथने (२८) स्टॉइनिसला सोबत घेत संघाचा विजयी झेंडा फडकावला.

श्रीलंकेचा डाव

कुसल परेरा आणि पथुम निसांका यांनी डावाची सुरुवात केली. पण निसांकाला मोठी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने त्याला वॉर्नरकरवी झेलबाद केले. त्यानंतर चरिथ असलंका आणि परेराने आक्रमक खेळीचा नजराणा पेश करत जुन्या लंका संघाची आठवण करून दिली. या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या माऱ्याला निष्प्रभ करत अर्धशतकी भागीदारी केली. दहाव्या षटकात फिरकीपटू अॅडम झम्पाने असलंकाला बाद केले. असलंकाने ४ चौकार आणि एका षटकारासह ३५ धावा केल्या. पुढच्याच षटकात मिचेल स्टार्कने परेराचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. त्यानेही ४ चौकार आणि एका षटकारासह ३५ धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाने अविष्का फर्नांडो, वनिंदू हसरंगा आणि कप्तान दासुन शनाका यांना स्वस्तात माघारी धाडत लंकेला दबावात आणले. पण भानुका राजपक्षेने केलेल्या नाबाद ३३ धावांमुळे लंकेला दीडशेपार जाता आले. त्याने ४ चौकार आणि एका षटकारासह ३३ धावा केल्या. २० षटकात लंकेने ६ बाद १५४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्क, कमिन्स आणि झम्पा यांना प्रत्येकी २ बळी मिळाले.

हेही वाचा – सौरव गांगुलीचा राजीनामा..! IPLमधील नव्या संघामुळं घेतला ‘मोठा’ निर्णय

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया – डेव्हिड वॉर्नर, अॅरॉन फिंच (कर्णधार), मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड.

श्रीलंका – कुसल परेरा (यष्टीरक्षक), पथुम निसांका, चारिथ असलंका, अविष्का फर्नांडो, वनिंदू हसरंगा, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा, महेश थिक्षणा.

Story img Loader