दुबईच्या मैदानावर रंगलेल्या टी-२० विश्वचषक सुपर-१२ च्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने गतविजेत्या वेस्ट इंडिजला ६ गड्यांनी मात दिली. इंग्लंडचा कप्तान ईऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विंडीजच्या फलंदाजांनी सुमार कामगिरीचे प्रदर्शन करत आपल्या चाहत्यांना निराश केले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे विंडीजचा संघ अवघ्या ५५ धावांत सर्वबाद झाला. फिरकीपटू आदिल रशीदने २ धावात ४ बळी घेत वेस्ट इंडिजच्या डावाला सुरुंग लावला. प्रत्युत्तरात इंग्लंडने दबावात खेळत आपले चार फलंदाज गमावले, पण ९व्या षटकात त्यांनी विजय मिळवला. इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीला सामनावीर पुरस्कार मिळाला.
इंग्लंडचा डाव
सहज गाठता येणाऱ्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अतिशय खराब झाली. सात षटकापर्यंत त्यांनी आपले ४ फलंदाज गमावले. जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो आणि मोईन अली स्वस्तात बाद झाले. सातव्या षटकात विंडीजच्या होसेनने आपल्याच गोलंदाजीवर इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोनचा डाव्या बाजूला सूर मारत अफलातून झेल घेतला. त्यानंतर जोस बटलर आणि कप्तान ईऑन मॉर्गन यांनी नवव्या षटकात इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
विंडीजचा डाव
पहिल्या सहा षटकांच्या पॉवरप्लेमध्ये इंग्लंडने अफलातून गोलंदाजीचा नजराणा पेश करत वेस्ट इंडिजवर वर्चस्व राखले. एविन लुईस (३), लेंडल सिमन्स (६), ख्रिस गेल (१३), शिमरॉन हेटमायर (९) , ड्वेन ब्राव्हो (५), निकोलस पूरन (१) हे धुरंदर फलंदाज सपेशल अपयशी ठरले. १० षटकात वेस्ट इंडिजने ६ बाद ४४ धावा केल्या. त्यानंतर पुढच्या ११ धावांत विंडीजने अजून त्यांचे ४ फलंदाज गमावले. फिरकीपटू आदिल रशीदने वेस्ट इंडिजचा कप्तान कायरन पोलार्ड (६) , आंद्रे रसेल (०), ओबेद मकॉय (०), रवी रामपॉल (३) यांना माघारी धाडत विंडीजचा डाव संपुष्टात आणला. रशीदने २ धावांत ४ बळी घेतले. तर मोईन अली आणि टायमल मिल्स यांना प्रत्येकी २ बळी घेता आले.
हेही वाचा – T20 WC: स्टेडियममध्ये प्रेक्षकांना बसण्यासाठी खास उपाययोजना; एका बॉक्समध्ये…
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
इंग्लंड : जोस बटलर (यष्टीरक्षक), जेसन रॉय, डेविड मलान, इऑन मॉर्गन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद, टायमल मिल्स
वेस्ट इंडिज : एविन लुईस, लेंडल सिमन्स, ख्रिस गेल, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), कायरन पोलार्ड (कर्णधार), आंद्रे रसेल, ड्वेन ब्राव्हो, अकेल होसेन, ओबेद मकॉय, रवी रामपॉल