रविवारी न्यूझीलंडविरुद्ध भारताला आठ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने भारतावर आठ गडी राखून मात केली. भारताच्या पराभवानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने वक्तव्य केले असून भारतीय संघातील खेळाडूंनी साहसी खेळ दाखवला नाही. आम्ही हिंमत दाखवू शकलो नाही असे म्हटले आहे. यावरून भारतीय क्रिकेट संघाचे पहिले विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांनी न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीच्या टिप्पणीवर जोरदार टीका केली आहे.

आम्ही पुरेसे धैर्य दाखवू शकलो नाही असे कोहलीने सामन्यानंतर म्हटले होते.  दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने १११ धावांचे लक्ष्य १४.३ षटकांत दोन गडी गमावून पूर्ण केले. या पराभवामुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली खूपच निराश दिसत होता. भारतीय संघाचे पराभवाचे कारण खेळाडूंची खराब कामगिरी असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला की, खेळाडू बॅटींग आणि बॉलींग दोन्हीमध्ये धाडस दाखवू शकले नाहीत.

कोहलीचे हे विधान कपिल देव यांना पटलेले नाही आणि त्यांनी कर्णधाराने अशी विधाने टाळावीत असे म्हटले आहे. एबीपी वृत्तवाहिनीवर बोलताना कपिल देव यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “त्यांच्यासारख्या मोठ्या खेळाडूसाठी हे अत्यंत कमकुवत विधान आहे. जर संघाची देहबोली अशी असेल आणि कर्णधाराची अशी विचारसरणी असेल तर संघाला वर नेणे खरोखर कठीण आहे. त्याचे बोलणे ऐकून मला थोडे विचित्र वाटले. तो तसा खेळाडू नाही. तो एक सेनानी आहे. मला वाटते की, आम्ही पुरेसे धैर्य दाखवले नाही किंवा आम्ही पुरेसे धाडस दाखवत नव्हतो असे कर्णधाराने बोलू नये. तुम्ही तुमच्या देशासाठी खेळत आहात आणि त्यांना आवड आहे. पण अशी वक्तव्ये केली तर नक्कीच लोक तुमच्याकडे बोट दाखवतील,” असे कपिल देव म्हणाले.

सामन्यानंतर “मला वाटत नाही की आम्ही आमच्या खेळात बॅटींग किंवा बॉलींगमध्ये धैर्य दाखवू शकलो नाही. आम्ही मैदानात उतरलो तेव्हा आमच्या बॉडी लँग्वेजमध्ये फारसे धैर्य नव्हते आणि न्यूझीलंडची देहबोली चांगली होती. आम्हाला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा आम्ही विकेट गमावल्या. अनेकदा असे घडते जेव्हा तुम्हाला शंका असते की तुम्ही शॉट खेळावा की नाही. तुम्ही भारतीय क्रिकेट संघाकडून खेळता तेव्हा तुमच्याकडून खूप अपेक्षा असतात,” असे विराट कोहली म्हणाला.

Story img Loader