टी-२० वर्ल्डकपमध्ये बाबर आझमच्या नेतृत्वात खेळणारा पाकिस्तान संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मात्र उपांत्य फेरीत पाकिस्तान संघासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. यामुळे त्यांचा मार्ग सहज नसणार हे मात्र नक्की. ऑस्ट्रेलिया संघ योग्य वेळी फॉर्मात आला असून पाकिस्तानची विजची घोडदौड रोखण्याची शक्यता आहे. टी-२० वर्ल्डकप २०१६ मध्ये पहिल्याच फेरीत बाहेर पडल्यानंतर पाकिस्तान संघाने यावेळी चांगली कामगिरी केली आहे. २००९ मध्ये वर्ल्डकप जिंकणारा पाकिस्तान सध्याच्या वर्ल्डकपमध्ये एकही सामन्यात पराभूत झालेला नाही.

उपांत्य फेरीत पाकिस्तान संघाकडे ११ वर्ष जुना वचपा काढण्याची संधी आहे. टी-२० वर्ल्डकप २०१० मधील उपांत्य फेरीत माईक हसीने केलेल्या जबरदस्त खेळीच्या आधारे ऑस्ट्रेलियाने अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता.

त्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना कामरान अकमल (५०) आणि उमर अकमलच्या (५६) फलंदाजीच्या आधारे ऑस्ट्रेलियासमोर १९२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाची स्थिती १७.१ ओव्हर्समध्ये १४४ धावांवर सात गडी बाद अशी झाली होती. १७ चेंडूंमध्ये ऑस्ट्रेलियाला ४८ धावांची गरज होती. यावेळी माईक हसीने २४ चेंडूंमध्ये तीन चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद ६० धावा करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. या सामन्यात खेळणारे डेव्हिड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ आणि मोहम्मद हाफिज यावेळीदेखील उपांत्य फेरीत खेळणार आहेत.

युएईमधील मैदानांवर पाकिस्तानची जबरदस्त खेळी

दबावात असतानाही युएईमध्ये पाकिस्तान संघ चांगली कामगिरी करत आहे. २००९ मध्ये श्रीलंका संघाच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये फार काळासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात आलं नव्हतं. पाकिस्तानने युएईमध्येच देशांतर्गत सामने खेळवले होते. पाकिस्तान सुपर लीगच्या अनेक स्पर्धा इथे आयोजित करण्यात आल्या होत्या.

भारताचा पराभव करत विजयी सुरुवात करणारा पाकिस्तान संघ सध्या जबरदस्त फॉर्मात असून सर्व सामने जिंकले आहेत. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानविरोधातील सामन्यातील विजयासोबत त्यांनी आपणच विजयाचे दावेदार असल्याचं दाखवलं आहे.