टी-२० विश्वकरडंक स्पर्धेत भन्नाट फॉर्मात खेळणाऱ्या पाकिस्तानने चौथ्या विजयाची नोंद करत उपांत्य फेरीत धडक दिली आहे. बाबरसेनेने नवख्या नामिबियाला ४५ धावांनी हरवले. अबुधाबीच्या शेख झायेद मैदानावर पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्पर्धेतील यशस्वी सलामी जोडी बाबर आणि मोहम्मद रिझवान यांनी पुन्हा एकदा जबरदस्त सुरुवात दिली. बाबरच्या ७० तर रिझवानच्या नाबाद ७९ धावांमुळे पाकिस्तानने २० षटकात २ बाद १८९ धावा केल्या. प्रत्युत्तरात डेव्हिड वीज आणि क्रेग विल्यम्स यांनी झुंज दिली, पण ती अपुरी पडली. २० षटकात नामिबियाला ५ बाद १४४ धावांपर्यंतच पोहोचता आले. रिझवानला सामनावीर पुरस्कार मिळाला.
नामिबियाचा डाव
पाकिस्तानच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना नामिबियाची सुरुवात खराब झाली. त्यांनी मायकेल व्हॅन लिंगेनला लवकर गमावले. हसन अलीने त्याला बाद केले. त्यानंतर सलामीवीर स्टीफन बार्ड आणि क्रेग विल्यम्स यांनी संघाला अर्धशतक पार करून दिले. बार्ड (२९) धावा केल्या. त्यानंतर ठराविक अंतरानुसार नामिबियाने आपले फलंदाज गमावले. अनुभवी डेव्हिड वीजने झुंज दिली पण, ती अपुरी ठरली. वीजने ३ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४३ धावा केल्या.
पाकिस्तानचा डाव
बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पाकिस्तानला जबरदस्त सुरुवात मिळवून दिली. नेहमी आक्रमक खेळणाऱ्या रिझवानने संयमी तर बाबरने आक्रमक पवित्रा धारण केला. नवव्या षटकात अर्धशतक फलकावर लावल्यानंतर या दोघांनी पुढच्या चार षटकात पाकिस्तानला शतकी पल्ला ओलांडून दिला. वेगवान गोलंदाज डेव्हिड वीजने नामिबियाला पहिले यश मिळवून दिले. त्याने बाबरला वैयक्तिक ७० धावांवर झेलबाद केले. बाबरने ७ चौकार ठोकले. त्यानंतर आलेला फखर झमान स्वस्तात तंबूत परतला. अनुभवी मोहम्मद हफीज शेवटपर्यंत खेळपट्टीवर स्थिरावला. त्याने १६ चेंडूत ५ चौकारांसह नाबाद ३२ धावा केल्या. तर रिझवानने शेवटच्या षटकात २४ धावा कुटल्या. तो ८ चौकार आणि ४ षटकारांसह ७९ धावांवर नाबाद राहिला. २० षटकात पाकिस्तानने २ बाद १८९ धावा केल्या.
हेही वाचा – खरं की काय..! अनुष्का शर्मानं घेतल्या ५ विकेट; BCCIच्या ‘त्या’ ट्वीटमुळं विराट होतोय ट्रोल
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, हॅरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.
नामिबिया – स्टीफन बार्ड, क्रेग विल्यम्स, मायकेल व्हॅन लिंगेन, गेर्हार्ड इरास्मस (कर्णधार), जेन निकोल लॉफी-ईटन, जेन ग्रीन (यष्टीरक्षक), डेव्हिड वीज, जेजे स्मिट, जेन फ्रीलिंक, रुबेन ट्रम्पेलमन आणि बेन शिकोंगो.