भारतीय संघाचा आयसीसी टी २० वर्ल्ड कपमधील प्रवास संपला आहे. भारतीय संघाने नामिबियाविरुद्ध नऊ गडी राखून शानदार विजय नोंदवल्यानंतर कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांना भव्य निरोप देण्यात आला. आयसीसीच्या स्पर्धेसोबत रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून करार संपला. सामना संपल्यानंतर रवी शास्त्री यांनी ड्रेसिंग रूममध्ये भावनिक भाषण केले आणि हा संघ भारतीय क्रिकेट इतिहासातील महान संघ असल्याचे सांगितले. आयसीसी ट्रॉफी जिंकून आम्ही ते अधिक चांगले करू शकलो असतो, पण हा खेळ आहे आणि भविष्यात आम्हाला त्यासाठी संधी मिळेल, असे शास्त्री म्हणाले.
“तुम्ही एक संघ म्हणून माझ्या अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. गेल्या काही वर्षांत आपण जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन जिंकलो. आपण प्रत्येक फॉरमॅटमध्ये जिंकलो आणि सर्व संघांना हरवले. यामुळे तुम्ही भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील महान संघ आहात. या संघाने गेल्या पाच-सहा वर्षांत उत्तम खेळ दाखवला आहे,” असे रवि शास्त्री ड्रेसिंग रूममध्ये म्हणाले.
“गेल्या पाच-सहा वर्षात या संघाने कशी कामगिरी केली हे निकालावरून दिसून येते. आपण आयसीसीच्या दोन स्पर्धा जिंकू शकलो असतो पण तसे झाले नाही आणि हाच खेळ आहे. तुम्हाला आणखी एक संधी मिळेल. तुम्ही पुढच्या वेळी भेटाल तेव्हा तुम्ही अधिक हुशार आणि अनुभवी असाल. माझ्यासाठी आयुष्य म्हणजे तुम्ही जे मिळवता ते नाही, तर तुम्ही अडचणींवर कशी मात करता हे आहे,”असे रवी शास्त्री म्हणाले. या भाषणानंतर शास्त्रींनी सर्व खेळाडूंना मिठी मारली.
रवी शास्त्री यांचे संपूर्ण भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा..
दरम्यान, ट्वेन्टी-२० विश्वचषकादरम्यान भारतीय संघातील जवळपास सर्वच खेळाडू मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा थकलेले होते. त्याशिवाय ‘आयपीएल’ आणि विश्वचषकामध्ये अवघ्या दोन दिवसांचा फरक भारताच्या सुमार कामगिरीसाठी कारणीभूत ठरला, असे स्पष्ट मत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.