काही दिवसांवर आलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. पण आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात अनेक खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे बीसीसीआय अडचणीत आले आहे. हे पाहता शनिवार ९ ऑक्टोबर रोजी मंडळाची बैठक होणार आहे. बैठकीत बदल मंजूर केले जाऊ शकतात. कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक रवी शास्त्री, बोर्डाचे सचिव जय शाह आणि निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. आयसीसीच्या नियमांनुसार संघ १० ऑक्टोबरपर्यंत बदल करू शकतात.
‘या’ मुंबईकराला मिळणार संधी?
इनसाइड स्पोर्ट्सच्या बातमीनुसार, बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. यामध्ये इशान किशनच्या जागी संघात श्रेयस अय्यरचा समावेश केला जाऊ शकतो. अय्यर सध्या राखीव खेळाडू म्हणून सहभागी आहे. इशान यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये फक्त ११, १४ आणि ९ धावा करू शकला. पण त्याने शेवटच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध २५ चेंडूत नाबाद ५० धावांची आक्रमक खेळी केली. दुसरीकडे, श्रेयस अय्यरने ४७, ४३, १, ३३ आणि २ अशा खेळ्या केल्या आहे. याशिवाय सूर्यकुमार यादवही अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करू शकलेला नाही.
चहर की चहल?
लेगस्पिनर राहुल चहरला यूएईमध्ये आतापर्यंत फारशी कामगिरी करता आलेली नाही. त्याला ४ सामन्यात फक्त २ बळी मिळवता आले आहेत. शेवटच्या २ सामन्यांमध्ये त्याला प्लेइंग-११ मध्येही स्थान मिळाले नाही. दुसरीकडे, लेग स्पिनर यजुर्वेंद्र चहलने संयुक्त अरब अमिरातीमध्ये ६ सामन्यांमध्ये ११ विकेट घेत आपली कामगिरी सिद्ध केली आहे. त्याच्या कामगिरीच्या जोरावर आरसीबी संघ आयपीएलच्या प्लेऑफमध्येही पोहोचला आहे.
हेही वाचा – IPL 2021 : ‘‘बरं झालं मुंबई इंडियन्स संघ स्पर्धेबाहेर झाला”, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचं मत!
भारताचा १५ सदस्यीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.
स्टँड बाय प्लेयर्स: श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर.