ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पर्धेतील सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. ऍरॉन फिंचच्या नेतृत्वाखाली कांगारूंनी अंतिम फेरीत न्यूझीलंडचा आठ विकेट्स राखून पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावले. आश्चर्याची बाब म्हणजे आयसीसीने निवडलेल्या संघात एकाही भारतीय गोलंदाज किंवा फलंदाजाचा समावेश करण्यात आलेला नाही. आयसीसीने या संघाच्या कर्णधारपदाची पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमकडे सोपवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या संघात डेव्हिड वॉर्नर आणि जोस बटलर यांची सलामीवीर म्हणून निवड करण्यात आली आहे. या दोन्ही खेळाडूंची कामगिरी संपूर्ण टी २० स्पर्धेत उत्कृष्ट राहिली. या स्पर्धेत बटलरचे एकमेव शतक आहे. या संघातील मधल्या फळीतील फलंदाजांवर नजर टाकली तर इथेही एकापेक्षा एक नावं आहेत. यामध्ये बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर, चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेचा चारिथ अस्लंका, पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम आणि सहाव्या क्रमांकावर इंग्लंडचा मोईन अली आहे. या आयसीसी संघात आशिया खंडातील केवळ चार जणांना स्थान मिळाले आहे.

फलंदाजीनंतर गोलंदाजीचा विचार केला तर संघात दोन फिरकीपटू आणि तीन वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. आयसीसीने फिरकीपटूंमध्ये श्रीलंकेच्या वानिंदु हसरंगा आणि अॅडम झम्पा यांची निवड केली आहे, तर जोस हेझलवूड, ट्रेंट बोल्ट आणि अॅनरिक नॉर्टजे हे वेगवान गोलंदाज आहेत. आयसीसीने या संघाचा १२वा खेळाडू म्हणून पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीची निवड केली आहे. संपूर्ण स्पर्धेत शाहीनची कामगिरी उत्कृष्ट होती.

आयसीसी टी २० वर्ल्ड कप प्लेइंग इलेव्हनमध्ये डेव्हिड वॉर्नर, जोस बटलर, बाबर आझम, चारिथ अस्लंका, एडन मार्कराम, मोईन अली, वानिंदु हसरंगा, अॅडम झम्पा, जोस हेझलवूड, ट्रेंट बोल्ट, अॅनरिक नॉर्टजे, शाहीन आफ्रिदी (१२वा) या खेळाडूंचा समावेश आहे.

अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबिया विरुद्ध तीन सामने जिंकण्याआधी पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारताला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. ज्युरी सदस्यांना भारतीय खेळाडूंपैकी एकही खेळाडू निवडण्यास योग्य वाटला नाही, तर दक्षिण आफ्रिकेचे एडन मार्कराम आणि अनिर्च नोर्टजे आणि श्रीलंकेचे चरिथ असालंका आणि वानिंदु हसरंगा या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. मात्र त्यांचे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले नाहीत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup 2021 team tournament babar azam captain abn