टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत गतविजेच्या वेस्ट इंडिजला जबर धक्का बसला आहे. अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात श्रीलंकेने झुंजार खेळ दाखवत वेस्ट इंडिजला २० धावांनी नमवले आणि सोबतच स्पर्धेबाहेर ढकलले. विंडीजचा कप्तान कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. स्पर्धेहबाहेर गेलेल्या श्रीलंकेने मुक्तपणे फलंदाजी करत २० षटकात ३ बाद १८९ धावा उभारल्या. लंकेकडून सलामीवीर पाथुम निसांका आणि चरिथ असलांका यांनी दमदार अर्धशतके ठोकली. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजला २० षटकात ८ बाद १६९ धावांपर्यंतच पोहोचता आले. श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडो, करुणारत्ने आणि हसरंगा यांनी प्रत्येकी दोन बळी घेत विंडीजला गुडघे टेकवण्यास भाग पाडले. अर्धशतकी खेळी केलेल्या असलांकाला सामनावीर पुरस्कार मिळाला.
वेस्ट इंडिजचा डाव
श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. त्यांनी ख्रिस गेल, एव्हिन लुईस, रोस्टन चेस या स्टार खेळाडूंना स्वस्तात गमावले. मागील सामन्यापासून सूर पकडलेला निकोलस पूरन उभा राहिला. त्याने ६ चौकार आणि एक षटकारांसह ४६ धावांची खेळी केली. १२व्या षटकात चमीराने त्याला तंबूत धाडले. पूरननंतर स्फोटक डावखुरा फलंदाज शिमरोन हेटमायरने एकतर्फी झुंज दिली पण दुसऱ्या बाजूने त्याला साथ लाभली नाही. हेटमायरने ८ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ८१ धावा ठोकल्या. २० षटकात वेस्ट इंडिजला ८ बाद १६९ धावा करता आल्या. श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडो, करुणारत्ने आणि हसरंगा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
श्रीलंकेचा डाव
पाथुम निसांका आणि यष्टीरक्षक कुसल परेरा यांनी लंकेच्या डावाची सुरुवात केली. या दोघांनी ४२ धावांची सलामी दिली. आंद्रे रसेलने पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात परेराला (२९) झेलबाद केले. त्यानंतर मैदानात आलेल्या चरिथ असलांकाने निसांकासोबत अर्धशतकी भागीदारी उभारली. या दोघांनी संघाला शतकी पल्ला गाठून दिला. १६व्या षटकात निसांका तर १९व्या षटकात असलांका बाद झाला. निसांकाने ५ चौकारांसह ५१ तर असलांकाने ८ चौकार आणि एका षटकारासह ६८ धावा केल्या. या दोघांनंतर कप्तान दासुन शनाकाने आक्रमक २५ धावा ठोकल्यामुळे संघाने १८९ धावा फलकावर लावल्या.
हेही वाचा – शेन वॉर्नचं अश्लील कृत्य! टीव्ही शोमध्ये ‘तिनं’ केला धक्कादायक खुलासा; म्हणाली, “५२ वर्षाचा हा माणूस…”
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
श्रीलंका – पाथुम निसांका, कुसल परेरा (यष्टीरक्षक), चरित असलांका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमिरा, महेश थिक्षणा, बिनुरा फर्नांडो
वेस्ट इंडिज – ख्रिस गेल, एव्हिन लुईस, रोस्टन चेस, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), कायरन पोलार्ड (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, आंद्रे रसेल, ड्वेन ब्राव्हो, जेसन होल्डर, अकिल हुसेन, रवी रामपॉल.