सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये अनेक खेळाडू हे सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहेत.आगामी टी-२० विश्वचषकातील संघ निवडीसाठी आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील सामने महत्त्वाचे ठरणार आहेत. जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२४ साठी भारताचा संघ कसा असावा, कोणत्या खेळाडूंना संधी मिळावी, याबाबत क्रिकेट तज्ञ, माजी क्रिकेटपटू सोशल मिडियावर आपआपली मते मांडत आहेत. यादरम्यानच माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी संघ कसा असावा, कोणत्या खेळाडूंनी संघात संधी मिळाली पाहिजे, यावर आपले मत मांडले आहे.
शिवम दुबे आणि रिंकू सिंग यांचा टी-२० विश्वचषक २०२४ साठी भारतीय संघात समावेश केला पाहिजे, असे मत व्यंकटेश प्रसाद यांनी व्यक्त केले. यंदाच्या आयपीएलमध्ये शिवम दुबे चेन्नई सुपर किंग्ज (CSK) साठी पहिल्याच सामन्यापासून चमकदार कामगिरी करत आहे. त्याने १६० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजमधील फिरकीला अनुकूल परिस्थितीत दुबेचे योगदान बहुमोल ठरू शकते. इतकेच नव्हे तर सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंगसोबत दुबेला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देता येईल असेही म्हटले.
माजी क्रिकेटपटूच्या या प्लेईंग इलेव्हनसंबंधित ट्विटवरून असे दिसून येते की, विश्वचषकाच्या संघात हार्दिकला जागा मिळणे कठीण असेल. कारण वरील तीन खेळाडूंच्या उल्लेखासह त्यांनी म्हटले की, संघात विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या उपस्थितीमुळे व्यवस्थापन फक्त यष्टीरक्षक-फलंदाजाच्या स्थानाचा विचार करेल.
प्रसाद यांनी ट्विटमध्ये म्हटले,”शिवम दुबेच्या फिरकीविरुद्ध मोठे शॉट्स खेळण्याच्या क्षमतेसाठी, सूर्या (कुमार यादव) टी-२० मधील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फलंदाज आणि रिंकू सिंग त्याच्या अपवादात्मक फिनिशिंग क्षमतेसाठी; टी-२० विश्वचषकात या तिघांना प्लेइंग इलेव्हनमध्ये एकत्र खेळवण्याचा मार्ग भारतीय व्यवस्थापनाने शोधल्यास ते खूप फायदेशीर ठरेल. संघात विराट आणि रोहित यांच्या उपस्थितीमुळे, या पाच जणांनंतर केवळ एका यष्टीरक्षक फलंदाजासाठी जागा उरणार आहे. त्यामुळे हे मुद्दे लक्षात घेत संघबांधणी कशी होईल, हे पाहण्यासारखे असेल.
आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा एप्रिल महिन्यातील अखेरीस होऊ शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) सुचनांनुसार विश्वचषकासाठी संघ सादर करण्याची अंतिम तारीख १ मे आहे. त्यानंतर प्रत्येक संघाला बदल करण्यासाठी २५मे पर्यंत फक्त एकच संधी मिळेल.