Rohit Sharma Wife Ritika Emotional After Winning: टीम इंडियानं २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत विजेतेपद पटकावलं. भारतीय संघानं या स्पर्धेत एकही सामना न गमावता, अंतिम फेरीतही तोच ट्रेंड कायम ठेवला आणि दक्षिण आफ्रिकेला हरवून १७ वर्षांची प्रतीक्षा संपवली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं ग्रुप स्टेज आणि सुपर ८ मध्ये प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाचा पराभव केला. अनेक वर्षांपासून टीम इंडियाचे चाहते पाहत असलेलं स्वप्न अखेर रोहित शर्मानं शनिवारी रात्री पूर्ण केलं. टी-२० विश्वचषकामध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करीत भारतानं दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं इतिहास रचला आहे. अंतिम फेरीच्या या सामन्यात टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी थरारक विजय मिळवीत ११ वर्षांनी आययीसी स्पर्धेत विजेतेपद आणि १७ वर्षांनी टी-२० वर्ल्ड कप जिंकला. या विजयानंतर भारतीय खेळाडूंच्या डोळ्यांत आनंदाश्रू दिसून आले. मात्र, खेळाडूंसहित त्यांचे कुटुंबीयही तितकेच खूश होते. यावेळी रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका यांचा विजयानंतरचा एक भावनिक क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एतिहासीक विजयानंतर रोहितच्या पत्नीला अश्रू अनावर
टीम इंडिया जिंकल्यानंतर सर्वच जण भावूक झाले. सर्व टीम इंडियाच्या खेळाडूंचे भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाले असून, आता रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका यांचा रडतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्मानं पत्नी रितिकाला मिठी मारत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी पत्नी रितिकालाही अश्रू अनावर झाले. रोहितने जिंकल्यानंतर आपल्या पत्नी व मुलीची भेट घेतली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. रोहित शर्माची पत्नी रितिका ही मैदानात रोहित खेळत असताना पत्नी व चाहती या नात्यांनी नवऱ्याला नेहमीच खंबीरपणे साथ देताना दिसत असते.
‘जेव्हा त्याचा विजय हा तुमचा विजय असतो’
रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये रोहित खूप भावूक झाल्याचे दिसत आहे आणि रितिका त्याला मिठी मारत आहे. रितिकाने आपल्या करिअरमध्ये रोहितला खूप साथ दिली आहे. रितिकाने रोहित खेळत असलेला जवळपास प्रत्येक सामना स्टेडियमवर बसून पाहिला आहे. आता विश्वचषक जिंकल्यानंतर भावूक होऊनही तिनं रोहितला आधार दिलाय. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर hauterrfly नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावेळी या व्हिडीओला ‘जेव्हा त्याचा विजय हा तुमचा विजय असतो’, अशी कॅप्शन दिली आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> T20 World Cup 2024: “चांगल्या लोकांबरोबर नेहमी चांगलंच होतं कारण…” ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माची खास प्रतिक्रिया
असा झाला अंतिम सामना
नाणेफेक जिंकून रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताने सात विकेट गमावून १७६ धावा केल्या होत्या. त्यामध्ये विराट कोहलीने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करीत दक्षिण आफ्रिकेच्या घशात जाणारा विजयाचा घास हिसकावून घेतला. भारताने अंतिम फेरीच्या या सामन्यात सात धावांनी विजय मिळवला. हार्दिक पांड्याने सर्वाधिक तीन बळी घेतले. जसप्रीत बुमराह व अर्शदीप सिंग यांनीही चांगली कामगिरी केली. अक्षर पटेलनेही एक विकेट घेतली.