Rohit Sharma T20 WC 2024: अनेक वर्षांपासून टीम इंडियाचे चाहते पाहत असलेलं स्वप्न अखेर रोहित शर्मानं शनिवारी रात्री पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेचा पराभव करीत भारतानं दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर नाव कोरलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं इतिहास रचला आहे. टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी थरारक विजय मिळवीत ११ वर्षांनी आययीसी स्पर्धेत विजेतेपद आणि १७ वर्षांनी टी-२० विश्वचषक जिंकला. या विजयानंतर भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर खुशीचे हावभाव अन् डोळ्यांत आनंदाश्रू, असं भारतीय चाहत्यांना अपेक्षित चित्र दिसून आलं. अशातच रोहित शर्मा या ऐतिहासिक विजयानंतर काय म्हणाला? ते आपण जाणून घेऊ. अंतिम फेरीच्या या सामन्याद्वारे टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने जी प्रतिक्रिया दिली, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“चांगल्या लोकांबरोबर नेहमी चांगलंच होतं”

यावेळी बोलताना रोहित म्हणाला की, “मी यावर विश्वास ठेवतो की जे लिहलं आहे ते होणार आहे, त्यामुळे आम्ही जिंकणार होतो आणि आम्ही जिंकलो. तसेच तुम्ही म्हणाल्याप्रमाणे चांगल्या लोकांबरोबर नेहमी चांगलंच होतं.

“एका दिवसांत झालेलं नाही गेल्या ४ वर्षांची मेहनत आहे”

पुढे तो म्हणाला की, “गेल्या चार वर्षात आम्ही जे अनुभवले ते सांगणं खूप कठीण आहे. पडद्यामागे एक संघ म्हणून आम्ही खूप मेहनत घेतली. हे आम्ही आज जे केलंय ते एका दिवसात झालेलं नाही, त्यामागे गेल्या ४ वर्षांची मेहनत आहे. असंही तो म्हणाला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Rohit Sharma : हिटमॅनने टी-२० विश्वचषकात रचला इतिहास, आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला न जमलेला केला पराक्रम

कॅप्टन रोहित शर्माचा निवृत्तीचा निर्णय

टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी-२० मधून निवृत्ती जाहीर केली. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार विराट कोहलीपाठोपाठ टी-२० विश्वचषकाचे जेतेपद जिंकताच रोहित शर्मानंही टी-२० क्रिकेटला ‘राम राम’ केला आहे. पत्रकार परिषदेत रोहित शर्मानं स्वत:च्या निवृत्तीची माहिती दिली. त्याबाबतची घोषणा करताना रोहित शर्मा म्हणाला, “हा माझा शेवटचा सामना होता. या फॉरमॅटला ‘अलविदा’ करण्याची यापेक्षा चांगली संधी असू शकत नाही. या फॉरमॅटचा प्रत्येक क्षण मी एन्जॉय केला आहे. मी या फॉरमॅटमध्ये खेळून भारतासाठी माझ्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि मला हेच हवे होते. मला हा विश्वचषक जिंकायचा होता.” विराट-रोहितसारखी अनुभवी आणि आजी-माजी कर्णधारांची जोडी निवृत्त झाल्यानं क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup 2024 ind vs sa final team india captain rohit sharma what says know video viral rohit sharma retirement srk