New Zealand T20 World Cup Squad: आगामी टी-२० विश्वचषकासाठी न्यूझीलंडकडून संघ जाहीर करण्यात आला आहे. कर्णधार केन विल्यमसनच्या नेतृत्त्वाखाली ब्लॅककॅप्सचा संघ विश्वचषकात उतरणार आहे. पण न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर करण्याच्या त्यांच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या वर्ल्डकपसाठी दोन लहान मुलांनी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा केली. तर संघाने टी-२० विश्वचषकासाठी नवी जर्सी लाँच केली आहे, जिचा लुक रेट्रो लुकसारखा आहे, त्याचबरोबर ही जर्सी १९९९ सालच्या किटसारखीही आहे.
न्यूझीलंडमधील मटिल्डा आणि अँगस या दोन लहान मुलांनी पत्रकार परिषद घेत संघाची घोषणा केली, ज्यामुळे हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. न्यूझीलंड हा विश्वचषकासाठी संघ जाहीर करणारा पहिला देश ठरला आहे. अनुभवी केन विल्यमसनच्या नेतृत्त्वाखालील संघात कोणकोणत्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, पाहूया.
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर
अनुभवी केन विल्यमसन हा खेळाडू म्हणून सहावा आणि कर्णधार म्हणून चौथा टी-२० विश्वचषक खेळणार आहे. याचसोबत अनुभवी गोलंदाज टीम साऊथीलाही संघात संधी मिळाली आहे, जो टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांपैकी आहे आणि आपला सातवा टी-२० विश्वचषक खेळणार आहे. यासोबतच आयपीएलमध्ये आणि जगभरातील टी-२० लीगमध्ये घातक गोलंदाज म्हणून ओळख असलेला ट्रेंट बोल्टलाही संघात संधी देण्यात आली आहे, जो आपला ५वा वर्ल्डकप खेळणार आहे.
टी-२० लीगमुळे बोल्टला अमेरिकेत खेळण्याचाही अनुभव आहे. साऊथी आणि बोल्टसोबतच लॉकी फर्ग्युसन आणि मॅट हेन्री हे वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहेत. न्यूझीलंडने आपल्या टी-२० विश्वचषक संघात अनेक अष्टपैलू खेळाडूंचाही समावेश केला आहे. मायकेल ब्रेसवेल व्यतिरिक्त डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र आणि मिचेल सँटनर हे गोलंदाजीसोबत फलंदाजीही करू शकतात. २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत किवी संघाने उपांत्य फेरी गाठली होती.
न्यूझीलंड संघाने जाहीर केलेल्या संघातील १५ पैकी १३ हे खेळाडू २०२२ मधील वेस्ट इंडिज दौऱ्याचा भाग असलेले खेळाडू आहेत, जेणेकरून खेळाडूंना तेथील परिस्थितीशी जुळवून घेता येतील. त्याचसोबत सहा खेळाडू हे कॅरेबियन प्रिमीयर लीग या टी-२० स्पर्धेत खेळलेले खेळाडू आहेत. याचसोबत सध्या आयपीएलमध्ये खेळत असलेल्या न्यूझीलंडच्या जवळपास सर्वच खेळाडूंना विश्वचषकात संघ स्थान देण्यात आहे. केन विल्यमसन गुजरात टायटन्स संघाचा खेळाडू आहे, तर ट्रेंट बोल्ट राजस्थान रॉयल्सचा महत्त्वाचा गोलंदाज आहे. डेव्हॉन कॉन्वे (दुखापतीमुळे आयपीएल २०२४ मधून बाहेर), रचिन रवींद्र आणि मिचेल सँटनर हे चेन्नई संघातील खेळाडू आहेत. ग्लेन फिलीप्स हा हैदराबाद संघाचा खेळाडू आहे, तर लॉकी फर्ग्युसन आरसीबीकडून खेळतो.
न्यूझीलंड संघ
केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, ट्रेंट बोल्ट, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी