मुंबई : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना, अशी विद्यमान टी-२० विश्वचषक स्पर्धेची स्वप्नवत परिणती गृहीत धरून तरंगणाऱ्या अब्जावधी क्रिकेटरसिकांना इंग्लंडच्या क्रिकेट संघाने गुरुवारी झटक्यासरशी जमिनीवर आणले. अॅडलेड येथे झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा १० गडी आणि ४ षटके राखून दारुण पराभव केला.
आयपीएलची जन्मभूमी आणि टी-२० क्रिकेटची धनभूमी असलेल्या भारताचा क्रिकेट संघ हल्ली जागतिक स्पर्धामध्ये बाद फेरीपलीकडे फारसा जात नाही आणि गेलाच तर उपान्त्य फेरीतच गारद होतो हे वारंवार दिसून आले आहे. विश्वचषक २०१५ आणि २०१९, तसेच टी-२० विश्वचषक २०१६ आणि आता टी-२० विश्वचषक २०२२ ही ठळक उदाहरणे! त्याचबरोबर उल्लेखनीय बाब म्हणजे, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ आणि क्रिकेटपटू असलेल्या या संघाला २०१३मधील चँपियन्स करंडक स्पर्धेनंतर एकही जागतिक स्पर्धा जिंकता आलेली नाही.
इंग्लंडविरुद्ध गुरुवारचा पराभव जिव्हारी लागणारा ठरला, पण असे एकतर्फी पराभव भारतासाठी आता अपवादात्मक राहिलेले नाहीत. गतवर्षी यूएईमध्ये पाकिस्ताननेही साखळी सामन्यात भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. यंदा उद्घाटनाच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा थरारक पराभव केला. पण, प्रत्येक पराभवातून शिकत जिद्दीने खेळून आणि थोडीफार नशिबाची साथ लाभलेला पाकिस्तान आज अंतिम फेरीत पोहोचला. याउलट साखळी टप्प्यात अव्वल ठरलेला भारत मोक्याच्या सामन्यात खेळ उंचावण्यात अपयशी ठरला आणि स्पर्धेबाहेर फेकला गेला. भारतीय संघातील पहिले तीन फलंदाज (रोहित, राहुल, विराट) हे जवळपास समान शैलीचे आहेत. या तिघांपैकी विराट कोहली भलताच यशस्वी ठरला आणि भारताच्या उपान्त्य फेरीपर्यंतच्या प्रवासात त्याच्या फलंदाजीचा वाटा अमूल्य ठरला. पण रोहित आणि राहुल यांना एकत्रित सूर गवसलाच नाही. पॉवर-प्लेमध्ये दे-मार फलंदाजी करून प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर दबाव आणण्याचे तंत्र हे दोघे बहुधा विसरल्यासारखे खेळत राहिले. अशा प्रकारची फलंदाजी नंतरच्या षटकात केवळ सूर्यकुमार यादव आणि काही प्रमाणात हार्दिक पंडय़ा यांनीच केली.जसप्रीत बुमराची अनुपस्थिती भारताला विलक्षण जाणवली. भुवनेश्वर आणि अर्शदीप हे गोलंदाज स्विंग गोलंदाजीवर भर देतात. बुमराचा वेग त्यांच्याकडे नाही. त्यामुळे परिस्थिती स्विंगला साथ देणारी असेल, तेव्हा त्यांची गोलंदाजी प्रभावी ठरते. अन्यथा टी-२०मध्ये मुरलेले फलंदाज त्यांच्या मध्यमगतीची पिसे काढतात, हे इंग्लंडविरुद्ध पुन्हा दिसून आले. रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाचा समतोल बिघडला. त्याची उणीव मैदानावर क्षेत्ररक्षणाच्या वेळी विशेष जाणवली. भारताचे क्षेत्ररक्षण या स्पर्धेत अत्यंत सुमार राहिले. फिरकीमध्ये त्याच्याऐवजी समावेश झालेले अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन प्रभाव पाडू शकले नाहीत. सर्वोत्तम ११ खेळाडू मैदानात उतरवण्यातील अपयश आणि असे खेळाडू उपलब्ध नसतील, तर पर्यायी व्यवस्थेचा अभाव ही भारताच्या अलीकडच्या काळातील स्पर्धा अपयशाची ठळक वैशिष्टय़े ठरतात, याचा विचारही निवड समिती आणि क्रिकेट मंडळाला करावा लागणार आहे.
‘काही खेळाडू निवृत्ती जाहीर करतील’
अॅडलेडमधील पराभवानंतर भारतीय संघातील काही वरिष्ठ खेळाडू आपली निवृत्ती जाहीर करू शकतील, असा अंदाज दिग्गज माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी व्यक्त केला. ‘या संघामध्ये तिशीपुढील काही खेळाडू आहेत आणि आता त्यांनी संघातील आपल्या स्थानाबाबत विचार करायला हवा,’ असे ते म्हणाले. ‘भविष्यातील भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पांडय़ाकडे असेल,’ असे मतही त्यांनी व्यक्त केले.
अश्विन, कार्तिक, रोहित शर्मा, विराट कोहली हे खेळाडू टी-२० सामन्यांमध्ये आता अपवादात्मक दिसतील, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली. संघनिवडीत अश्विन आणि कार्तिक यांना यांचा विचारच केला जाणार नाही तर, रोहित आणि विराट यांना याबाबत निर्णय घेण्यासाठी वेळ दिला जाईल, असे या सूत्राने सांगितले.
पराभवाची कारणे
- कर्णधार रोहित शर्माचे अपयश
- सलामीवीरांकडून धडाक्यात प्रारंभच नाही
- बुमरासारख्या तेज गोलंदाजाची उणीव
- कार्तिक की पंत! अखेपर्यंत गोंधळ
- कोहली, सूर्यकुमारवर गरजेपेक्षा अधिक विसंबून
- प्रभावहीन फिरकी गोलंदाजी
- टी-२० क्रिकेटविषयी जुनाट, अनाकर्षक संकल्पना
- सुमार क्षेत्ररक्षण