हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियन माऱ्यासमोर भारतीय महिलांचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. साखळी फेरीपर्यंत आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या भारतीय महिला अंतिम फेरीत कांगारुंच्या जाळ्यात अडकल्या. ८५ धावांनी बाजी मारत ऑस्ट्रेलियन महिलांनी आपला पाचवा टी-२० विश्वचषक जिंकला.
साहजिकच आहे, पराभव झाल्यानंतर भारतीय क्रिकेट प्रेमींना वाईट वाटणार. कारण विजयी होणं कोणाला नको असतं?? प्रत्येक जण त्यासाठीच प्रयत्न करत असतो. मात्र पराभवानंतर विशेषकरुन सोशल मीडियावर पराभवाला गोंजारण्याचा ट्रेंड सुरु होतो, तो न पटण्यासारखा आहे. टीम इंडिया अंतिम फेरीत वाईट्ट खेळल्या ही वस्तुस्थिती आहे, आणि याच खराब खेळामुळे त्यांना हार स्विकारावी लागली.
संपूर्ण स्पर्धेत भारतीय महिलांच्या कामगिरीचा आढावा घेतला…तर शफाली वर्मा आणि दिप्ती शर्मा या दोन फलंदाजांचा अपवाद वगळला तर सर्व फलंदाज अपयशी ठरले. भारतीय महिला संघातही मोठी नावं आहेत…स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर, जेमायमा रॉड्रीग्ज, तानिया भाटीया या सर्व चांगल्या फलंदाज आहेत. मात्र यापैकी एकही फलंदाज या संपूर्ण स्पर्धेत आपली छाप पाडू शकल्या नाहीत. अंतिम फेरीच्या सामन्यातही फलंदाजांची हीच हाराकिरी भारतीय संघाला भोवली. संपूर्ण स्पर्धेत तुमच्या संघातील दोन फलंदाज सोडल्या तर कोणीही खेळ करत नाहीये ही बाब विरोधी संघाच्या नजरेतून कशी सुटेल?? अंतिम फेरीसाठी ऑस्ट्रेलियन संघाने योग्य व्यूहरचना करत भारताच्या शफाली वर्माला स्वस्तात माघारी धाडलं आणि भारतीय संघाची पडझड सुरु झाली. संपूर्ण स्पर्धेत शफाली अपयशी ठरली तर तिला दुसरा पर्याय काय यावर उपाय शोधण्यात भारतीय महिला संघाचं व्यवस्थापन अपयशी ठरलं. साखळी फेरीमध्ये गोलंदाजांनी आपल्या कामगिरीवर भारताला सामने जिंकवले. मात्र अंतिम फेरीसाठी पाटा खेळपट्टी बनवत कांगारुंनी भारताच्या ब्रम्हास्त्रातली हवा काढून घेतली.
या पराभवानंतर, आम्हाला तुमचा अभिमान आहे, भारतीय महिलांचा हा सर्वात तरुण संघ होता…इ.इ. सबबी यायला सुरुवात झाली आहे. मुळात विश्वचषकासारख्या स्पर्धेत पराभव झाल्यानंतर वयाची सबब देणं ते देखील पराभवानंतर हे योग्य नाही. १६ वर्षीय शफाली वर्मात टॅलेंट होतं, म्हणूनच तिला संघात जागा मिळाली. फक्त शफाली खेळली नाही तर मग पुढे काय यावर उत्तर शोधायला संघ कमी पडला हे मान्यच करावं लागेल. सलामीच्या फलंदाजांचे झेल सोडणं, ढिसाळ क्षेत्ररक्षण, गरज नसताना हवेत केलेली फटकेबाजी हा अंतिम सामन्यात खेळणाऱ्या संघाचा खेळ नक्कीच नाही. विश्वचषकाचा अंतिम सामना हा केवळ एक-दोन खेळाडूंच्या जिवावर जिंकता येत नाही.
भारतीय महिलांच्या कामगिरीला कमी लेखण्याचा यात मुळीच हेतू नाही. त्यांनी केलेली कामगिरी ही अफाट आहे. फक्त पराभूत झाल्यानंतर सहानुभूती दाखवण्यापेक्षा, तुम्ही खराब खेळल्यामुळे हरला आहात! पण तरीही आम्ही तुमच्यासोबत आहोत, हे सांगायला हवं. विजय मिळवला की ज्याप्रमाणे आपण खेळाडूंचं कौतुक करतो त्याच पद्धतीने पराभव झाला की स्पष्ट बोलणं हेदेखील क्रिकेट प्रेमी म्हणून आपलं काम आहे. पराभव हे होतच असतात, त्यात काही वावगं नाही. पण पराभवानंतर विनाकारण मखलाशी करत मूळ गोष्ट नजरअंदाज करणं भविष्यासाठी धोकादायक ठरु शकतं.