आज आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा केवळ भारत आणि पाकिस्तानसाठीच नाही, तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठीही खूप महत्त्वाची आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची जगभरातील क्रिकेट चाहते वाट पाहत आहेत. आता हा सामना सुरू होण्यास फक्त काही तास शिल्लक आहेत. भारतीय वेळेनुसार हा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात पासून खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधी संध्याकाळी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी एक वैकल्पिक प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये हार्दिक पंड्या दिसला नाही. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मार्गदर्शक महेंद्रसिंह धोनीसोबत बराच वेळ घालवला.

मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू असलेल्या हार्दिकच्या पाकिस्तानविरुद्ध सामन्यातील समावेशाबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पाठीच्या शस्त्रक्रियेमुळे तो मागील काही महिन्यांपासून गोलंदाजी करू शकलेला नाही. त्यामुळे त्याच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हार्दिकला फक्त फलंदाज म्हणून संघात समाविष्ट करावे, की नाही यावर बराच काळ चर्चा सुरू आहे. कर्णधार विराटने भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले, की हार्दिक हा टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. सामन्यात कोणत्याही टप्प्यावर तो दोन षटके टाकू शकतो, पण त्याची फलंदाजी संघासाठी मौल्यवान आहे.

हेही वाचा – T20 WC : भारत-पाक सामन्यापूर्वी शाहिद आफ्रिदीचं आत्मसमर्पण; म्हणाला, “घाबरण्याची गरज..”

विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी या सराव सत्रादरन्यान भरपूर फलंदाजीचा सराव केला. ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनीही फलंदाजीचा सराव केला, श्रेयस अय्यरही फलंदाजी करताना दिसला. अय्यर १५ सदस्यीय संघाचा भाग नाही आणि राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियाशी संबंधित आहे. या ट्रेनिंगमध्ये हार्दिक पंड्याशिवाय इशान किशनही दिसला नाही.

Story img Loader