टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध १० गड्यांनी पराभवाला सामोरे जावे लागले. मानहानीकारक पराभव भारताच्या पदरी पडला. टीम इंडियाचे गोलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. वरुण चक्रवर्ती हा एक ‘मिस्ट्री’ फिरकीपटू म्हणून ओळखला जातो. पण तोसुद्धा या सामन्यात विकेट घेण्यात अपयशी ठरला. त्याच्या गोलंदाजीबाबत पाकिस्तानचा माजी खेळाडू सलमान बटने तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
स्पोर्ट्सकीडाच्या वृत्तानुसार, सलमान बटने त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हटले, ”वरुण चक्रवर्ती कदाचित मिस्ट्री बॉलर असेल, पण तो आमच्यासाठी तसा नव्हता. पाकिस्तानातील मुले खूप टेप बॉल क्रिकेट खेळतात. पाकिस्तानमधील प्रत्येक मुलगा अशा प्रकारची गोलंदाजी गल्ल्यांमध्ये खेळतो. तिथे ही मुले गोलंदाजीदरम्यान बोटांच्या युक्त्या वेगवेगळ्या प्रकारे वापरतात.”
बटने श्रीलंकेचा माजी गोलंदाज अजंथा मेंडिसचे उदाहरण देताना सांगितले, ”माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात श्रीलंकेच्या अजंथा मेंडिसनेही अनेक संघांना त्रास दिला. पण त्याचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही. काही काळानंतर श्रीलंकेने त्याला भारताविरुद्ध खेळणे थांबवले. मिस्ट्री बॉलिंगमध्ये आम्हाला कधीच मिस्ट्री मिळाली नाही, कारण आम्ही अशा प्रकारचे गोलंदाज खेळून मोठे झालो आहोत.”
हेही वाचा – IND vs PAK : ‘‘तो एक जागतिक…”’, मोहम्मद शमीच्या पाठीशी क्रिकेटचा देव राहिला उभा!
टी-२० विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा एकूण सहावा सामना होता. यावेळी पाकिस्तान संघाला विजयाची संधी मिळाली. याआधी प्रत्येक वेळी वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ जिंकला होता. प्रथम खेळताना भारतीय संघाने लवकर ३ गडी गमावले. यानंतर, विराट कोहली आणि ऋषभ पंत यांच्या चांगल्या भागीदारीमुळे संघाची धावसंख्या १५० पर्यंत पोहोचली. कमी धावसंख्येमुळे पाकिस्तानवर फारसे दडपण नव्हते आणि त्यांनी एकही विकेट न गमावता सामना जिंकला.
बटला भोगावा लागलाय कारावास
पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट २०१०मध्ये झालेल्या स्पॉ़ट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळला होता. यामुळे त्याला तुरूंगात जावे लागले. एवढेच नव्हे, तर त्याच्यावर १० वर्षांची बंदीदेखील घालण्यात आली. ऑगस्ट २०१०मध्ये झालेल्या लॉर्ड्स कसोटीत बुकी मजहर मजीद याच्यासह तीन क्रिकेटपटूंनी स्पॉट फिक्सिंग केले होते. कसोटी सामन्यात कर्णधार सलमान बटच्या आदेशानुसार मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आमिर यांनी नो-बॉल टाकला होता. या घटनेमुळे क्रिकेटविश्व हादरले होते. दोषी आढळलेल्या खेळाडूंना तुरूंगात जावे लागले. बंदीनंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर मैदानात परतल्यानंतर निवृत्त झाला आहे,