१९९२ ते २०१९ दरम्यान झालेल्या एकदिवसीय विश्वचषक आणि टी -२० विश्वचषकात टीम इंडियाचे वर्चस्व नेहमीच पाकिस्तानवर राहिले. पण काल खेळल्या गेलेल्या टी -२० विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानने हा विक्रम मोडला. पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव करत एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या आहेत. अनेकजण सध्या मेंटॉर म्हणून काम करणाऱ्या भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी संघात हवा होता, अशा चर्चा करत आहेत. दरम्यान टी -२० विश्वचषक २०१६ मध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर पत्रकार परिषदेत एमएस धोनीने केलेले वक्तव्य जोरदार व्हायरल होत आहे.
एमएस धोनी टी -२० विश्वचषक २०१६ सामन्यानंतर पत्रकार परिषदेत म्हणाला होता की, “आम्ही ११-० असा विजय मिळवला याचा आम्हाला अभिमान आहे. पण भविष्यात आपण कधीतरी नक्कीच हरणार हेही एक सत्य आहे. तुमचा आज पराभव होईल किंवा १० वर्षांनंतर होईल, २० वर्षांनी होईल किंवा ५० वर्षानंतर होईल. कारण असे कधीच होणार नाही की तुम्ही सतत जिंकत राहाल. एमएस धोनीच्या या वक्तव्याला तब्बल ५ वर्ष पूर्ण झाली आहेत. विश्वचषकाच्या इतिहासात सलग १२ विजयानंतर टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्ध पराभव झाला आहे.
एमएस धोनीच्या नेतृत्वात ७ वेळा पाकिस्तानविरुद्ध विजय
१९९२ च्या विश्वचषकात भारताने पहिल्यांदा पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर १९९६,१९९९, २००३, २००७ (दोनदा पराभ केला), २०११, २०१२, २०१४, २०१५, २०१६, २०१९ मध्ये परावभ केला. या सर्व विजयांमध्ये भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली ७ वेळा विजय मिळवला. त्याने ५ टी-२० विश्वचषक सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर २०११ आणि २०१५ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला. याशिवाय, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक २०१९मध्ये पाकिस्तानचा पराभव केला होता.