पाकिस्तानने अखेर विश्वचषकात भारताविरुद्ध विजय मिळवला आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून मानहानीकारक पराभव केला. याआधी, १९९२ ते २०१९ पर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण १२ विश्वचषक (एकदिवसीय आणि टी२० सह) सामने खेळले गेले होते आणि ते सर्व भारताने जिंकले होते. दुबई येथे झालेल्या या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात होते. मात्र, कोहलीच्या संघाला अपेक्षित खेळ करण्यात अपयश आले. १५२ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने १७.५ षटकांत गाठत ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतावर सहा प्रयत्नांत पहिल्या विजयाची नोंद केली.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेव्हाही सामना खेळला जातो तेव्हा त्याआधीच वातावरण तयार होऊ लागते, त्याचप्रमाणे या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंगने जेव्हा पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये पराभव पत्करावा लागतो, तेव्हा तो भारताविरुद्ध खेळत का राहतो? असे म्हटले होते.
भज्जीने या सामन्यापूर्वी म्हटले होते की, भारताला पाकिस्तानविरुद्ध सहज विजय मिळायला हवा. मात्र पाकिस्तानच्या विजयानंतर शोएब अख्तरने हरभजनला उत्तर दिले आहे. अख्तरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आणि हरभजनला विचारले की त्याला अजून वॉकओव्हरची गरज आहे का?
सामन्याचा निकाल येताच अख्तरने ट्विट करून विचारले की, हरभजन सिंग तू कुठे आहेस? या सामन्यात भारत पूर्णपणे अपयशी ठरला. नाणेफेक जिंकण्यापासून सामना जिंकण्यापर्यंत, पाकिस्तानने भारताला सामन्यात परतण्याची संधी दिली नाही.
दुबई येथे झालेल्या या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात होते. मात्र, कोहलीच्या संघाला अपेक्षित खेळ करण्यात अपयश आले. १५२ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने १७.५ षटकांत गाठत ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतावर सहा प्रयत्नांत पहिल्या विजयाची नोंद केली. रिझवान आणि आझम या भरवशाच्या सलामीवीरांनी या वर्षांतील चौथी शतकी भागीदारी रचली. रिझवानने ५५ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या सहाय्याने नाबाद ७९ धावांची, तर आझमने ५२ चेंडूत सहा चौकार, दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावांची खेळी साकारली.